INDvsAUS : रोहितने रचला पाया, कोहलीने चढवला कळस; भारताने मालिका घातली खिशात!

टीम ई-सकाळ
सोमवार, 20 जानेवारी 2020

शतकी खेळी करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माला 'मॅन ऑफ द मॅच' तर कॅप्टन कोहलीला 'मॅन ऑफ द सिरिज'ने गौरविण्यात आले.

बंगळूर : येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने कांगारुंचा 7 विकेटने धुरळा उडवत सामना जिंकला. आणि याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीरांनी जोरदार सुरवात केली. संघाचे धावफलकावर 71 रन्स जमा झाल्या तेव्हा के.एल.राहुल 19 रन्सवर पायचित झाला. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. 

एकेरी, दुहेरी मधूनच एखादा चौकार-षटकार ठोकत रोहित-विराटने भारताचा धावफलक हलता ठेवला. रोहितने 128 बॉलचा सामना करताना 8 फोर आणि 6 सिक्स लगावत 119 रन्स केल्या. आणि तिथेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो झॅम्पाच्या बॉलिंगवर स्टार्ककडे कॅच देत बाद झाला. 

रोहित बाद झाल्यानंतर कॅप्टन कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. श्रेयस अय्यरला साथीला घेत त्याने भारताला विजयाच्या जवळपास नेले. मात्र, टीमला 13 रन्सची गरज असताना हेजलवूडने कोहलीचा बोल्ड उडवला. कोहलीने 91 बॉल्सचा सामना करताना 8 फोर्सच्या बळावर 89 धावांची अर्धशतकी खेळी केली.

मात्र, दुसरीकडे श्रेयसही एकेरी आणि दुहेरी धावा काढत 44 धावांवर पोहोचला. कोहली बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मनिष पांडेने हेजलवूडला फोर लावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शतकी खेळी करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माला 'मॅन ऑफ द मॅच' तर कॅप्टन कोहलीला 'मॅन ऑफ द सिरिज'ने गौरविण्यात आले. 

दरम्यान, भारतीय बॉलर्सनी आज, ऑस्ट्रेलियाला जखडून ठेवलं होतं. एकवेळ ऑस्ट्रेलिया 330 रन्सचा टप्पा पार करेल असं वाटत असताना, त्यांना 286 रन्सपर्यंत रोखण्यात भारताला यश आलं. त्यातही ऑस्ट्रेलियाला स्टिव्ह स्मिथच्या शतकामुळं एवढी मजल मारता आली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मिथनं 132 बॉल्समध्ये 131 रन्स काढून, ऑस्ट्रेलियाला सावरलं. स्मिथशिवाय केवळ ऑस्ट्रेलियाच्या लबुशेन याला थोडाफार भारतीय बॉलर्सपुढं टिकाव धरता आला. त्यानं 54 रन्स केल्या.

भारताकडून मोहम्मद शमीनं चार विकेट्स घेऊन उल्लेखनीय काम गिरी केली. डावाच्या सुरुवातीलाच शमीनं वॉर्नरला माघारी धाडल्यानंतर अॅरॉन फिंच नाट्यमय रित्या रन आऊट झाला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या बॅकफूटवर गेल्याचं दिसत होतं. स्मिथनं डाव तर सावरलाच पण, टीमला समाधानकारक रन्स करून दिल्या. ऑस्ट्रेलियन विकेटकीपर कॅरीनं 36 बॉल्समध्ये 35 रन्स करून शेवटच्या काही ओव्हर्समध्ये फटकेबाजी केली. पण, त्याचा टीमला फारसा फायदा झाला नाही.

धावफलक :

ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 289/9 : स्टीव्ह स्मिथ 131 (14 चौकार, 1 षटकार), लबुशेन 54 (5 चौकार), कॅरे 35 (6 चौकार), मोहम्मद शमी 63-4, रविंद्र जडेजा 44-2. 

भारत : 47.3 षटकांत 289/3 : रोहित शर्मा 119 (8 चौकार, 6 षटकार), विराट कोहली 89 (8 चौकार), श्रेयस अय्यर 44* (6 चौकार, 1 षटकार); हेजलवूड 55-1, एगर 38-1, झॅम्पा 44-1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsAUS India beat Australia by 7 wickets to win series 2 by 1