भारताचा अकरावा मालिका विजय; दुसऱ्या कसोटीत आफ्रिका चारीमुंड्या चीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india won second test and series by an innings South Africa Pune

भारताचा अकरावा मालिका विजय; दुसऱ्या कसोटीत आफ्रिका चारीमुंड्या चीत

पुणे : गोलंदाजांच्या आणखी एका अचूक कामगिरीच्या जोरावर भारताने कसोटी क्रिकेटमधील आपली दहशत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही कायम ठेवली. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाचा दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी 1 डाव आण 137 धावांनी पराभव केला. भारताचा कसोटी क्रिकेटमधील हा सलग अकरावा मालिका विजय ठरला. तिसरा कसोटी सामना रांची येथे असला, तरी भारतीयांनी पुण्यातच दुसरी कसोटी जिंकून मालिकेचा निर्णय निश्चित केला. भारताच्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली सामन्याचा मानकरी ठरला.

साहा तू पण काय भावा; कसली तुझी हवा

भारताच्या प्रत्येक गोलंदाजांने प्रभावी कामगिरी केली. पण, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या व्हर्नान फिलॅंडर आणि केशव महाराज यांनी केलेला प्रतिकार विसरता येणार नाही. पहिल्या डावात 326 धावांनी पिछाडीवर राहिल्यावर दक्षिण आफ्रिका संघाचा दुसरा डाव 189 धावसंख्येवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिका संघातील एकही प्रमुख फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर आत्मविश्वासाने उभा राहू शकला नाही. मात्र, व्हर्नान फिलॅंडर आणि केशव महाराज या दोघांनी दुसऱ्या डावातही आपल्या संघाचाच पराभव टाळण्याचे नाही, पण लांबविण्याचे काम चांगले बजावले. या जोडीची आठव्या विकेटसाठी झालेली 56 धावांची भागीदारी हेच दक्षिण आफ्रिकेसाठी समाधान देणारे ठरले. भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गजी बाद केले. आर. अश्विनने दोन गडी बाद करून त्यांना सुरेख साथ केली.

पुण्यातील हवामान आणि खेळपट्टीचा स्वभाव लक्षात घेता भारतीय कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन देण्याचा अपेक्षित निर्णय घेतला. इशांत शर्माने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्करम याला पायचित करून भारताच्या विजयाची ना़ंदी दिली. त्यानंतर थेऊनिस डी ब्रुईन आणि डीन एल्गार यांनी जम बसवण्यास सुरवात केली होती. आक्रमकता हाच सर्वोत्तम बचाव असे ठरवून त्यांनी फलंदाजी करायला सुरवात केली. मात्र, त्यांच्या आक्रमकतेत आत्मविश्वासाचा अभाव होता. चेंडू कधी बॅटची कड घेऊन, तर कधी हवेतून सीमापार जात होते. मात्र, नेटाने गोलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने आपल्या लेगसाईडला जाणाऱ्या चेंडूने ब्रुईनला चकवले. ग्लान्स करण्याच्या नादात चेंडू बॅटची कड  घेऊन यष्टिरक्षक साहाच्या हातात कधी विसावला हे ब्रुईनला देखील कळले नसेल. साहाने आपल्या डावीकडे झेपावत अफलातून झेल घेतला. त्यानंतर खेळायला आलेल्या कर्णधार फाफ डू प्लेसी पहिल्या चेंडूपासून गोंधळलेल्या परिस्थितीत होता. 

विराट कोहली म्हणतो, मला रायगडावर जायचंय

प्लेसी बिचकत असल्याचे पाहून समोरून डीन एल्गारने धावा सुरू ठेवल्या होत्या. धावांसाठी धडपडणारा प्लेसी आपल्या अकारण बचावापायी आपली विकेट गमावून बसला. अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक साहाने तिसऱ्या प्रय़त्नांत त्याचा झेल घेतला. सेनापतीच पडल्यावर इतकावेळ तळ ठोकणाऱ्या एल्गारचीही एकाग्रता भंग पावली आणि जडेजाला फटकाविण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. उपाहाराला चार बाद 71 अशा स्थितीत असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्याच षटकांत धक्का बसला. जडेजानो डी कॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर तेम्बा बावूमा आणि फिलॅंडर जोडी जमल्यासारखी वाटत असताना जडेजाच्या गोलंदाजीवर रहाणेने स्लिपमध्ये बावूमाचा सुरेख झेल टिपला. लगोलग मुथुस्वामीही बाद झाला. पण, त्यानंतरपर पुन्हा एकाद फिलॅंडर आणि महाराज यांनी भारतीय गोलंदाजांना किमान चहापानापर्यंत तरी निराश केले. या दोघांचा प्रतिकार कौतुकास्पद ठरला. अखेरच्या सत्रात यादवने आपल्या लेगसाईडच्या चेंडूवर फिलॅंडरला चकवले आणि नंतर रबाडाची विकेट मिळविली. जडेजाने महाराजला पायचित बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Indvssa India Won Second Test Innings South Africa Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaCricketSouth Africa
go to top