INDvsWI : भारताचा 'विराट' विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली!

वृत्तसंस्था
Monday, 23 December 2019

तीन वनडे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकत भारताने सलग 10 वा मालिका विजयही साजरा केला.

कटक : रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीर जोडीने दमदार सलामी दिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीची झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात विंडीजचा पराभव करत मालिका विजय साजरा केला. आणि वर्षाअखेर गोड करत तमाम भारतीयांना आगामी वर्षासाठी विजयी शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विंडीजने दिलेले 316 धावांचे आव्हान भारताने 48.4 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आणि तीन वनडे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. यासह भारताने सलग 10 वा मालिका विजयही साजरा केला.

- IND vs WI : अर्धशतकासह 'हिटमॅन'ने मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामी जोडीने डावाची सावध सुरवात केली. मात्र, खेळपट्टीवर जम बसल्यानंतर रोहित आणि राहुलने आपले वैयक्तिक अर्धशतक साजरे केले. त्यानंतर रोहित शतक झळकावतो का काय? असे वाटत असतानाच होल्डरने 21 व्या षटकांत त्याची विकेट घेतली. आपल्या अर्धशतकी खेळीत रोहितने 63 चेंडूत 63 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 

- Kai Po Che ते IPL : बघा दिग्विजय देशमुखचा स्वप्नवत प्रवास!

त्यानंतर राहुलही बाद झाला. त्याने 77 धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेला श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि ऋषभ पंत हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने काही काळ स्टेडियमवरच नाही, तर टी.व्हीवर जे प्रेक्षक मॅच पाहात होते, त्यांच्या चेहऱयावर चिंता स्पष्ट दिसत होती. 

मात्र, कर्णधार विराटने खिंड लढती ठेवली. जडेजाला साथीला घेत त्याने भारताचा डाव सावरला. विजयाच्या उंबरठ्यावर असताना विराट 85 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरने कॉट्रेलच्या ओव्हरमध्ये चौकार लगावत भारताचा विजय जवळपास निश्चित केला. विंडीजकडून पॉलने 3, तर शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

- INDvsWI : पदार्पणात 'नवदीप' कामगिरी; घेतल्या महत्त्वाच्या विकेट!

दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय तोफखान्याने टिच्चून आणि प्रभावी मारा केल्याने विंडीजच्या सलामीवीरांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शाई होप आणि एविन लुईस यांनी 57 धावांची सलामी दिली.

जडेजाने लुईसला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर नवख्या सैनीने हेटमायर, चेस यांना टिपले. रोस्टनही स्वस्तात माघारी परतला. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने पूरन आणि पोलार्डने सावध फलंदाजी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. पूरनने 89 आणि पोलार्डने नाबाद 74 धावांची खेळी साकारली. 

धावफलक : 
भारत : 48.4 षटकांत 6 बाद 316 (रोहित शर्मा 63-63 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, केएल राहुल 77-89 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, विराट कोहली 85-81 चेंडू 9 चौकार, रविंद्र जडेजा 29-21 चेंडू, 3 चौकार, कीमो पॉल 49-3, शेल्डन कॉट्रेल 59-1, होल्डर 63-1) वि.वि. वेस्ट इंडिज : 50 षटकांत 5 बाद 315 (होप 42, पूरन 89, पोलार्ड 74*, सैनी 58-2, जडेजा 54-1, शमी 66-1, ठाकूर 66-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsWI India beat West Indies by 4 wickets