चौटाला यांच्याकडून टोलवाटोलवीचा डाव

पीटीआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

आयओसीने नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देण्याचा पवित्रा
नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी नियुक्तीवर तीव्र टीकेची चौफेर झोड उठल्यानंतरही हरियानाचे वादग्रस्त क्रीडा संघटक अभयसिंह चौटाला किल्ला नेटाने लढवीत आहेत. त्यांनी टोलवाटोलवीचा डाव टाकला आहे. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) आपली नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. याविषयी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनीच ‘आयओसी’ला विचारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चौटाला यांनी बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यावर टीका केली होती. नंतर त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती, पण गुरुवारी त्यांनी टोलवाटोलवीचा खेळ सुरू केला. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘या मानाच्या पदासाठी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी ‘आयओए’चे आभार मानू इच्छितो. मी हे मानद पद स्वीकारण्याविषयी आयओसी अनुकूल नसेल तर भारतीय क्रीडा क्षेत्र, क्रीडापटूंचे सर्वोत्तम हित; तसेच खेळातील चांगले प्रशासन, पारदर्शकता आणि सफाईसाठी त्याग करण्यास मला आनंदच वाटेल. ही भूमिका मी एक वेगळे पत्र लिहून यापूर्वीच आयओएला कळविले आहे. अध्यक्षांनी व्यक्तिशः यासंदर्भात ‘आयओसी’शी चर्चा करावी.’

त्यांनी गोयल यांच्यासह प्रसार माध्यमांवर नेम साधला. ‘खेळासाठी मी विनम्र योगदान दिले आहे. त्याची पावती म्हणून मला हा सन्मान देण्यात आला आहे. अशावेळी गोयल यांची तीव्र प्रतिक्रिया आणि प्रसार माध्यमांनीही याकडे इतके लक्ष देणे आश्‍चर्यकारक आहे. २०१३ मध्ये मी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्याग केला होता. वास्तविक तेव्हा ‘आयओए’ची घटना आणि भारतीय राज्य घटनेनुसार माझी निवड झाली होती. तीन नामवंत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मी निवडून आलो होतो.’
 
मोदींकडे जाण्याचे संकेत
चौटाला रिओ ऑलिंपिकला उपस्थित होते. त्यावरून वाद झाला होता. यासंदर्भात त्यांनी गोयल यांच्यावर नेम साधत वेळ आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, की ‘रिओमधील माझ्या उपस्थितीवरसुद्धा प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रिओमधील गोयल यांच्या वर्तणुकीची मला व्यक्तीशः जाणीव आहे. ‘आयओसी’नेच त्यांच्या तसेच सहकाऱ्यांच्या वर्तनावर आक्षेप घेऊन त्यांचे अधिस्वीकृती पत्र काढून घेण्याचा इशारा दिला होता. मला या प्रकरणी आणखी भाष्य करून क्रीडामंत्र्यांची स्थिती अवघड करायची इच्छा नाही; पण गरज पडल्यास मी पंतप्रधानांना रिओविषयी माहिती देईन.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ioc selection