esakal | संचारबंदीतही मुंबईत आयपीएल
sakal

बोलून बातमी शोधा

wankhede stadium

संचारबंदीतही मुंबईत आयपीएल

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मुंबई : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी जाहीर केली असली, तरी वानखेडे स्टेडियमवरील सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे. आयपीएलच्या वेळापत्रकानुसार मुंबईत अजून आठ सामने होणार आहेत. बुधवारी रात्रीपासून संचारबंदी सुरू झाल्यावर आयपीएलचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता; याबाबत विचारले असता गांगुली यांनी, वानखेडेवरील उर्वरित सामने नियोजनानुसार होतील, असे स्पष्टपणे सांगितले.

निर्बंधाचा फायदाच होईल

1 महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या निर्बंधांचा आम्हाला फायदाच होईल. त्यामुळे कोणीही अनावश्यक लोक स्टेडियमच्या परिसरात फिरणार नाही. परिणामी सामन्याचे आयोजन सोपे होईल. स्टेडियममध्ये आम्ही जैवसुरक्षा वातावरण तयार केले आहे. खेळाडूही त्याच वातावरणात आहेत. त्यामुळे कोणी कोरोनाबाधित स्टेडियममध्ये येण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

2 सरकारचे नियम तसेच कोरोनासंदर्भातील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. या महामारीला रोखण्यासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही करत राहण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. कठीण परिस्थितीचा सामना करून आम्ही वानखेडेवर पहिले दोन सामने सुरळीतपणे खेळवले. त्या वेळी रात्रीची जमावबंदी आणि वीकेंड लॉकडाऊनही होता. आता संचारबंदी असली, तरी उरलेले सामने खेळवण्यास अडथळे येणार नाहीत, असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा: IPL 2021 : संजूच्या विक्रमी शतकाला पराभवाचं ग्रहण! पंजाबचा भांगडा

सर्वांची चाचणी आणि सुरक्षा

मुंबईतील आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी वानखेडे स्टेडियमवरील १० ग्राऊंडसमन आणि प्लम्बरला कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु आता सामन्याच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येकाची नियमित चाचणी आणि त्यांनाही जैवसुरक्षा वातावरण ठेऊन अधिक खबरदारी घेण्यात आली आहे.