IPL 2021: CSKच्या धोनीची झलक पाहण्यासाठी चेन्नईकरांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

IPL 2021: CSKच्या धोनीची झलक पाहण्यासाठी चेन्नईकरांची गर्दी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या फारसा प्रकाशझोतात दिसत नाही. धोनीने २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळला. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. अखेर १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीने निवृत्ती जाहीर केली. IPL 2020च्या हंगामात धोनीच्या CSKला फारसे यश मिळू शकले नाही. IPL 2021च्या स्पर्धेत चेन्नईने चांगली कामगिरी केली होती. पण कोरोनाच्या फटक्यामुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली. आता १९ सप्टेंबरपासून IPL 2021चा उर्वरित हंगाम खेळवण्यात येणार आहे. त्याआधी धोनीची एक झलक पाहण्यासाठी चेन्नईकरांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

IPL 2020 मध्ये धोनीच्या संघाने अतिशय वाईट कामगिरी केली. धोनीला वैयक्तिक स्तरावरही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर धोनी IPL मधूनही निवृत्त होणार का? अशी चर्चा रंगली होती. पण धोनी IPL 2021च्या हंगामासाठी नव्या उमेदीने उतरला. सात सामन्यांमध्ये पाच सामने जिंकत धोनीच्या संघाने १० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. पण कोरोनामुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली. आता १९ सप्टेंबरपासून उर्वरित स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मात्र, ही स्पर्धा भारतात नसून युएईमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे युएईला रवाना होण्यासाठी CSKचा संघ आणि धोनी चेन्नईला आले होते. त्यावेळी धोनीच्या एका झलकीसाठी चाहत्यांनी गर्दी केली. त्याचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी धोनीचा भारदस्त मिशा असलेल्या एक फोटो व्हायरल झाला होता. T20 World Cup 2007 मध्ये धोनीने लांब केसांची स्टाईल करत विश्वचषक उंचावला. तेव्हापासूनच धोनीच्या विविध स्टाईल्स चाहत्यांना आवडू लागल्या. सध्यादेखील धोनीचा एक भारदस्त मिशी असलेला फोटो व्हायरल झाला. एका ठिकाणी धोनी आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेत होता. त्या फोटोत धोनीची वाढलेली दाढी आणि भारदस्त मिशा चांगल्याच उठून दिसत होत्या. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून धोनीचा नवा लूक लोकांना चांगलाच पसंतीस उतरताना दिसला.