esakal | मुंबईचे वर्चस्व की हैदराबादचा प्रतिकार?
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईचे वर्चस्व की हैदराबादचा प्रतिकार?

मुंबईचे वर्चस्व की हैदराबादचा प्रतिकार?

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

चेन्नई : अगोदरच्या सामन्यात पराभवाच्या वाटेवरून विजयाकडे झेप घेणारा मुंबई इंडियन्स संघ आणि विजयी मार्गावरून स्वतःला पराभवाच्या खाईत लोटणाऱ्या हैदराबाद या दोन संघात उद्या सामना होत आहे. मुंबईच्या खात्यात एका विजयाची तरी नोंद आहे; मात्र हैदराबाद अजूनही भोपळ्यातून बाहेर आलेले नाही. गत सामन्यात केलेल्या चुका हैदराबाद सुधारणार, की सापडलेली लय मुंबई कायम राखणार याची उत्सुकता उद्याच्या आयपीएल सामन्यात असेल.

मुंबई-कोलकाता आणि हैदराबाद-बंगळूर हे सामने अखेरपर्यंत धैर्याने खेळणे किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून देणारे आहे. मुंबईने कमाल करत १० धावांनी तो सामना जिंकला होता, तर चुकीचे फटके मारून हैदराबादच्या फलंदाजांनी शेखचिल्लीसारखी अवस्था करून घेतली होती. पराभवाची हॅट्‍ट्रिक टाळण्यासाठी हैदराबादचा संघ तडफेने खेळ करण्याचा प्रयत्न करेल; परंतु कोलकाता सामन्यातील अनुभवावरून मुंबईचा संघही नव्या रणनीतीने उतरेल यात शंका नाही.

अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावत विजय मिळवला असला, तरी मुंबईच्या खेळात अजून सुसूत्रता आलेली नाही. फलंदाजी अजूनही भरवसा देणारी झालेली नाही. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता इतरांनी सलग दुसऱ्या सामन्यात निराशा केलेली आहे. त्यात ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि किएरॉन पोलार्ड यांचा समावेश आहे. या तिघांकडून उद्या मोठ्या अपेक्षा असतील.

IPL 2021 : जड्डूची कमाल; गेलचा झेल आणि राहुलचा गेम (VIDEO)

बंगळूरविरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर मुंबईची गोलंदाजी सावरली आहे. बुमरा-बोल्ट यांना लय मिळाली आहे. विशेष म्हणजे कृणाल पंड्या आणि राहुल चहर हे फिरकी गोलंदाज खेळपट्टीचा चांगला वापर करत आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी मुंबई संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.

हैदराबादसाठी फलंदाजीत फारच डोकेफोड करावी लागणार आहे. मनीष पांडेबाबत त्यांना विचार करावा लागणार आहे. त्याने भले दोन्ही सामन्यात बऱ्यापैकी धावा केल्या असल्या, तरी त्याचा अपेक्षित नसलेला स्ट्राईक रेट नंतरच्या फलंदाजांवर दडपण वाढवणारा आहे. उद्या एक तर मनीष पाडेला वगळले तरी जाईल किंवा त्याचा क्रमांक तरी बदलला जाईल.

संथ खेळपट्टी

चेन्नईची खेळपट्टी संथ झालेली आहे. दुसऱ्या डावात १५० धावांचा पाठलाग करतानाही दमछाक होत आहे. विराट कोहलीनेही याची कबुली दिली आहे. त्यामुळे नव्या चेंडूवर जास्तीत जास्त धावा करून नंतर संयमाने फलंदाजी करण्यावर भर दिला जाईल. चेंडूला फिरकही मिळत असल्याने हैदराबादचा रशीद खान मुंबईच्या फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. हैदराबादने पहिले दोन्ही सामने गमावलेले असले, तरी रशीदची फिरकी प्रभावी ठरलेली आहे.

आजचा सामना

मुंबई वि. हैदराबाद

आमनेसामने १६

८ विजय ८

२०८ सर्वोत्तम १७८

८७ नीचांक ९६

गेल्या पाचपैकी तीन सामन्यात मुंबईचा विजय

यातील एक सामना टाय

गेल्या दोन लढतीत प्रत्येकी एक विजय