Orange Cap In IPL 2021 : मराठमोळ्या ऋतुराजनं विक्रमी कामगिरीसह पटकावली ऑरेंज कॅप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad

मराठमोळ्या ऋतुराजनं विक्रमी कामगिरीसह पटकावली ऑरेंज कॅप

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 Orange Cap List : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील फायनलमध्ये मोजकी पण उपयुक्त खेळी करत ऋतुराज गायकवाडने मोठी कामगिरी आपल्या नावे केली. त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. 16 सामन्यातील 16 डावात 1 शतक आणि 4 अर्धशतकाच्या जोरावर ऋतुराजने 635 धावा केल्या. या धमाकेदार खेळीसह ऑरेंज कॅपवर त्याने कब्जा केला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑरेंज कॅप पटकवणारा तो सर्वात तरुण फलंदाजही ठरलाय. हा एक विक्रमच आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्जच्या दोन्ही सलामीवीरात चुरुस पाहायला मिळाली. फायनल लढतीपूर्वी 13 सामन्यातील 13 डावात 623 धावा करणारा लोकेश राहुल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या फायनलमध्ये संघाला दमदार सुरुवात करुन देणाऱ्या ऋतूराज गायकवाडनं त्याला ओव्हरटेक केले. ऋतूराज गायकवाडने 27 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 118.52 च्या सरासरीने 32 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर जीवदान मिळालेल्या फाफ ड्युप्लेसिसनं चेन्नई सुपर किंग्जकडून 86 धावांची खेळी करत या यादीत दुसऱ्या स्थानावर मजल मारली. फायनलमध्ये खेळणाऱ्या एकाच संघातील दोन सलामीवीर पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ऋतूराज गायकवाड पाठोपाठ फाफने 16 सामन्यातील 16 डावात 633 धावा केल्या.

फाफ ड्युप्लेसिस

फाफ ड्युप्लेसिस

या यादीत लोकेश राहुल तिसऱ्या स्थानावर राहिला. पंजाब किंग्जच्या लोकेश राहुलने या दोघांपेक्षा तीन सामने कमी खेळून 6 अर्धशतकांच्या जोरावर 626 धावा केल्या. पंजाब किंग्जचे आव्हान प्ले ऑफच्या आधीच संपुष्टात आले होते. नाबाद 98 धावा ही लोकेश राहुलची सर्वोच्च खेळी राहिली.

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनही या शर्यतीत आघाडीवर होता. त्याला चौथ्या स्थानावरच समाधाना मानावे लागले. त्याने 16 सामन्यातील 16 डावात 587 धावा केल्या.

या यादीत पाचव्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ग्लेन मॅक्सवेलचे नाव दिसते. मॅक्सवेलनं 15 सामन्यातील 14 डावात 6 अर्धशतकाच्या जोरावर हंगामात 513 धावा कुटल्या. 78 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

loading image
go to top