esakal | RCB vs RR : बंगळूरला विजयी चौकाराची संधी

बोलून बातमी शोधा

 Virat Kohli
RCB vs RR : बंगळूरला विजयी चौकाराची संधी
sakal_logo
By
ई सकाळ टीम

IPL 2021 : राजस्थान कितपत आव्हान उभे करणार याची उत्सुकता

मुंबई : सलग तीन सामन्यांत तीन विजय अशी बहारदार कामगिरी करत अव्वल स्थानावर असलेल्या बंगळूरला उद्या अडखळत असलेल्या राजस्थानचे आव्हान आहे. दोन्ही संघांच्या एकूणच कामगिरीचा अंदाज घेता विराट कोहलीच्या संघाला विजयी चौकार मारणे कठीण जाणार नाही. काही निसटते तर काही शानदार विजय मिळवत बंगळूर संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताविरुद्ध द्विशतकी धावा करून भक्कम फलंदाजीची प्रचीती दिली. गोलंदाजीतही कोणत्याही संघाला रोखण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला अपेक्षेपेक्षा जास्तच प्रयत्न करावे लागणार आहेत.

विराट आणि एबी डिव्हिल्यर्स असे धडाकेबाज फलंदाज असले तरी बंगळूरचा संघ अडखळत असायचा, परंतु आता ग्लेन मॅक्सवेलमुळे त्यांच्या फलंदाजीचा चेहरामोहराच बदलला आहे. तो बेधडक फलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी संघांचे सर्व डावपेच उधळून लावत आहे. उद्या राजस्थान संघाच्या गोलंदाजांना सावधगिरीपेक्षा अचूकता अधिक साधावी लागणार आहे.

  • ठिकाण - वानखेडे स्टेडियम, मुंबई

  • थेट प्रक्षेपण - संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्टस्

  • हवामानाचा अंदाज - अपेक्षित तपमान ३० अंश, आकाश काहीसे ढगाळलेले, पण पावसाची शक्यता नाही

  • खेळपट्टीचा अंदाज - प्रामुख्याने फलंदाजीस अनुकूल, पण गेल्या दोन लढतीपासून गोलंदाजांना चांगली साथ. धावांचा पाठलाग करणारा संघ गेल्या पाचपैकी तीन सामन्यात विजयी

  • गेल्या पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येकी दोन विजय

  • गतस्पर्धेतील दोनही लढतीत बंगळूरची सरशी

  • प्रथम फलंदाजी करताना बंगळूरचे तीन विजय, तर राजस्थानचे चार

  • बंगळूरचे सात विजय धावांचा पाठलाग करताना, तर राजस्थानचे सहा.