esakal | IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'

बोलून बातमी शोधा

ipl suspended
IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 Suspended : बायो-बबलमध्ये कोरोनाने छेद केल्यानंतर विविध संघातील खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एका मागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडत असताना बीसीसीआयने अखेर यंदाच्या हंगामातील स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएलनं याबाबत अधिृत पत्रक जारी केलं आहे. यामध्ये पुढील सुचना मिळेपर्यंत अनिच्छित कालावधीसाठी आयपीएल स्पर्धा स्थगित (IPL 2021 Suspended) करण्यात आल्याचं सांगितलं. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण यंदा बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धा मायदेशी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) ताफ्यातील वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वारियर (Sandeep Warrier) यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पर्धेवर संकट घोंगावण्यास सुरुवात झाली होती.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्ली (Delhi) आणि अहमदाबाद (Ahmedabad) येथे असणाऱ्या संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि अमित मिश्रा (Amit Mishra) यांचे कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह (Covid 19 Positive) आल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर यंदाच्या हंगामातील स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला.

हेही वाचा: "IPL साठी सरकारने परवानगी दिली; आता पलटी मारू नका"

देशात कोरोनाची परिस्थिती असताना आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. कोरोनाच्या पार्शभूमीवर मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु आणि कोलकाता या सहा ठिकाणी स्पर्धा घेण्याचे नियोजन बीसीसीआयने आखले. स्पर्धेच्या पूर्वी वानखेडेच्या मैदानातील काही ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. याच वेळी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. सामान्य नागरिकांवर निर्बंध लादण्यात येत असताना आयपीएल स्पर्धेला परवानगी कशी? असा प्रश्नही यावेळी उपस्थितीत झाला. या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत बीसीसीआयने ठरल्याप्रमाणे पुढेही स्पर्धा चालू ठेवली. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि चेन्नईमधील सामने नियोजित वेळापत्रकानुसार पार पडल्यानंतर आयपीएलमधील सहभागी संघ दिल्ली आणि अहमदाबादला रवाना झाले. अहमदाबाद आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने एक दुसऱ्याच्या ताफ्यात पसरला. त्यामुळे बीसीसीआयसमोर स्पर्धा रद्द करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. कोरोना काळात युएईच्या मैदानात यशस्वी स्पर्धा पार पाडणाऱ्या बीसीसीआयला आपल्या होम ग्राउंडवर यश मिळवता आले नाही.