मुंबईने काढले पराभवाचे उट्टे; आव्हान जिवंत

Rohit Sharma
Rohit Sharma

पुणे : कर्णधार रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवले. या विजयासह मुंबईने सलामीच्या लढतीत झालेल्या पराभवाचे उट्टेही काढले. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेन वॉट्सन आणि अंबाती रायडू यांनी सलामीला येत मिशेल मॅक्लेनघनच्या पहिल्याच षटकात फटकेबाजीस सुरवात केली. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रायडूने तिसऱ्याच चेंडूवर षटकार खेचत आपले मनसुबे स्पष्ट केले. पण, राजस्थानविरुद्ध शतक झळकाविणारा वॉट्सन कमाल करू शकला नाही. वॉट्सन कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर 12 धावांवर बाद झाला. रायडूने रैनाच्या साथीने संघाचा डाव सांभाळत फटकेबाजीस सुरवात केली. पॉवरप्लेच्या अखेरच्या हार्दिक पांड्याच्या षटकात रायडूने चौकार आणि षटकार खेचून संघाचे अर्धशतक पूर्ण केले. रायडू आणि रैना जोडीने मुंबईचा यशस्वी गोलंदाज मार्कंडेयचा सामना करत धावा जमाविल्या. मात्र, रायडू अर्धशतक करण्यात अपयशी ठरला. तो 46 धावांवर झेल देऊन बाद झाला. रायडू आणि रैनाच्या अर्धशतकी भागीदारीने संघाची धावसंख्या शंभरपर्यंत नेली. अखेर 13 व्या षटकानंतर धोनीनंतर आपली फटकेबाजी सुरु केली. त्याने पांड्याच्या षटकात सलग दोन चौकार मारले. रैनाने धोनीला साथ देत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, अखेरच्या षटकांमध्ये प्रयत्नात धोनी झेल देऊन 26 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ ड्वेन ब्राव्होही भोपळा न फोडताही बाद झाला. मात्र, रैनाने अखेरपर्यंत फलंदाजी करत संघाची धावसंख्या 169 पर्यंत पोचविली. रैनाने नाबाद 75 धावांची खेळी केली.

या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर सुर्यकुमार यादव आणि इव्हीन लुईस यांनी अर्धशतकी सलामी देत संघाला चांगली सुरवात करून दिली. यादवने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत चेन्नईच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मात्र, सुर्यकुमार यादव अर्धशतक झळकाविण्यात अपयशी ठरला. त्याला हरभजनसिंगने 44 धावांवर बाद केले. रवींद्र जडेजाने यादवचा सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. लुईस आणि रोहित शर्माने धावा जमावत चेन्नईला आणखी य़श मिळू दिले नाही. सावधरित्या फलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांनी सलामीच्या सामन्यातच झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर चार चौकार खेचत विजय आवाक्यात आणला. अखेरच्या षटकात विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

संक्षिप्त धावफलक : 
चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 5 बाद 169 (शेन वॉट्सन 12 - 11 चेंडू, 1 चौकार, अंबाती रायडू 46 - 35 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, सुरेश रैना 75 - 47 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, महेंद्रसिंह धोनी 26 - 21 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, मिशेल मॅक्लेनघन 2-26, कृणाल पांड्या 2-32, हार्दिक पांड्या 1-39) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : 19.4 षटकांत 2 बाद 170 (सुर्यकुमार यादव 44 - 34 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, इव्हीन लुईस 47 - 43 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, रोहित शर्मा नाबाद 56 - 33 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, हार्दिक पांड्या नाबाद 13 - 8 चेंडू, 1 षटकार)  

क्षणचित्रे -
- अंबाती रायडूने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 7 सामन्यांमध्ये 329 धावा
- आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचा 150 वा सामना
- पुण्यातील मैदानावर मुंबई इंडियन्स आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी आठ सामन्यात विजयी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com