
IPL च्या नव्या 2 टीम ठरल्या; BCCI मालामाल!
IPL Two new teams announcement : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु असताना आयपीएलच्या आगामी हंगामासंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. युएईच्या मैदानात आयपीएलच्या 14 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जच्या जेतेपदाच्या चौकारानंतर चर्चा रंगली होती ती आयपीएलमध्ये समाविष्ट होणाऱ्या नव्या दोन संघाबद्दल.
आयपीएलच्या आगामी हंगामात म्हणजेच 2022 ला 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. दोन नव्या संघाचे मालक कोण असणार? बीसीसीआयला यातून किती पैसा मिळणार? याच उत्तर आगामी आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी स्पष्ट झाले. आयपीएल स्पर्धेतील नव्या दोन संघाच्या शर्यतीत अहमदाबाद, कटक, धरमशाला, गुवाहटी, इंदूर आणि लखनऊ या सहा शहरांची निवड बीसीसीआयने केली होती. यात अपेक्षप्रमाणे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेले आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धा ज्या मैदानात भरवण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत त्या अहमदाबादला पसंती मिळाली आहे. त्याच्यासोबत लखनऊला दुसरी पसंती मिळालीये.
कोण असणार मालक?
अहमदाबादचा संघ सीव्हीसी कॅपिटल्स पार्टनर्सकडे गेला आहे. तर आरपीएसजीने RPSG Group लखनऊची मालकी मिळवली आहे. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद संघाची मालकी मिऴवण्यासाठी CVC Capital ने तब्बल 5166 कोटी मोजले. दुसरीकडे सर्वाधिक बोली लखनऊच्या संघासाठी लागली. RPSG Group ने 7,090 कोटींची बोली लावून या संघाची मालकी हक्क विकत घेतले.