Team India WTC Final : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! IPL रिझर्व्ह डे मुळे WTC फायनलचे झाले मोठे नुकसान | CSK vs GT IPL 2023 Final | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India WTC Final

Team India WTC Final : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! IPL रिझर्व्ह डे मुळे WTC फायनलचे झाले मोठे नुकसान

Team India WTC Final : पावसामुळे रविवारी 28 मे रोजी अहमदाबादमध्ये आयपीएल 2023 चा फायनल सामना होऊ शकला नाही. आता चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना सोमवारी 29 मे रोजी होणार आहे. मात्र एक दिवस उशीर झाल्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीवर परिणाम होईल.

अशाप्रकारे, डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघात समाविष्ट केलेले 3 खेळाडू आता आयपीएल फायनल 1 दिवसाने पुढे सरकल्यामुळे 2 दिवसांच्या विलंबाने इंग्लंडला पोहोचतील. भारताला 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे.

शुबमन गिल, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या जाणार्‍या आयपीएल 2023 च्या फायनलचा भाग आहेत. आता हे चार खेळाडू अंतिम रीशेड्यूलमुळे 2 दिवसांनी इंग्लंडला पोहोचतील. यापूर्वी ते 30 मे पर्यंत लंडनला पोहोचणे अपेक्षित होते. आता ते 31 मे नंतरच तिथे पोहोचू शकतील आणि भारताला 7 जूनपासून ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा सामना खेळायचा आहे.

शुभमन गिल, मोहम्मद शमी, रहाणे किंवा जडेजा लंडनला पोहोचल्यानंतर थेट सरावाला सुरुवात करण्याची शक्यता कमी आहे. 1 जूननंतरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडे त्याची पूर्ण टीम असेल. यानंतरही टीम इंडिया पूर्ण ताकदीने तयारी करू शकेल आणि इंट्रा स्क्वॉड मॅचेसचाही विचार केला जाईल.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्या बॅचचे खेळाडू 24 मे रोजीच लंडनला पोहोचले होते. यामध्ये विराट कोहली, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव या खेळाडूंचा समावेश होता. स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात सामील झालेले कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हेही रविवारी लंडनला रवाना झाले. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवही सोमवारपर्यंत इंग्लंडला पोहोचतील.