IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर दिल्ली-राजस्थानमध्ये आज सामना | Today’s IPL Match | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Match DC and rr

IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर दिल्ली-राजस्थानमध्ये आज सामना

मुंबई: भारतीय संघातून एकत्रित खेळताना कमाल केलेल्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीला ‘कुल- चा’ म्हणून संबोधले जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोघेही आपापल्या संघातून खेळताना चमक दाखवत आहेत, आज एकमेकांविरुद्ध ते कशी कामगिरी करतात यावर दिल्ली आणि राजस्थान संघांचे भवितव्य असणार आहे.

कोलकता संघाविरुद्ध हॅट्‌ट्रिक करणाऱ्या चहलकडे ‘पर्पल कॅप’ आहे. आत्तापर्यंत सहा सामन्यातून १७ विकेट मिळवून तो आघाडीवर आहे, तर दिल्ली संघातून खेळणारा कुलदीप सहा सामन्यांत १३ विकेट मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानने यंदा शानदार कामगिरी करत चांगली प्रगती केली आहे. सध्या गुणतक्त्यात ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आत्तापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा जॉस बटलर (३७५) आणि सर्वाधिक विकेट मिळणारा युझवेंद्र चहल (१७) राजस्थानच्या संघात असल्यामुळे त्यांची बाजू वरचढ आहे.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली संघ सहाव्या स्थानावर असला तरी त्यांच्याकडूनही आता मुसंडी मारण्याची झलक बुधवारच्या सामन्यातून दिसून आली. कोरोनाचे आलेले सावट झुगारून मैदानात उतरलेल्या या संघाला नवी उमेद मिळाली आहे. बुधवारच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा धुव्वा उडवून इतर सर्व संघांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीचे धैर्य

संघातील सहा सदस्य कोरोनाबाधित झाल्यानंतरही दिल्ली संघाने बुधवारी खेळण्याचे धैर्य दाखवले. अजून कोणी बाधित होणार नाही, याची अपेक्षा ते करत असतील. त्यामुळे उद्याही पूर्ण ताकदीचा संघ खेळवण्याची मुभा त्यांना मिळेल. हा सामना पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्यात होणार होता; परंतु प्रवास टाळण्यासाठी ही लढत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्यामुळे धावांचा पाऊस पडू शकेल.

राजस्थानकडे जॉस बटलर, संजू सॅमसन असे फलंदाज आहेत. बटलरने सहा सामन्यांत दोन शतके केलेली आहेत. त्यामुळे त्याला रोखण्याचे आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांसमोर असेल. बुधवारच्या सामन्यात शार्दूल ठाकूर नव्या चेंडूवर अपयशी ठरला होता, परंतु खलिल अहमद आणि मुस्तफिजूर रहमान यांनी विकेट मिळवल्या. त्यानंतर कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि ललित यादव असे फिरकी गोलंदाज दिल्लीच्या ताफ्यात आहेत.

पृथ्वी-वॉर्नर फॉर्मात

दिल्लीचे सलामीवर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांची बॅट तळपली की प्रतिस्पर्धी गोलंदाजांना शरण आणल्याशिवाय शांत होत नाही. बुधवारी पंजाबचे आव्हान दहा षटकांतच पार करून त्यांनी सर्वांना इशारा दिला आहे. राजस्थानच्या ताफ्यात टेंट्र बोल्ड हा हुशार गोलंदाज आहे. मुंबई इंडियन्सकडून गेले दोन मोसम खेळताना त्याने पृथ्वी शॉला अडचणीत टाकले आहे.

Web Title: Dc Vs Rr Who Will Win Todays Ipl Match Dc And Rr Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLIPL 2022