esakal | IPL 2021 : बेभान झालेल्या नेटकऱ्यांना मॅक्सवेलनं झोडपलं | RCB vs KKR
sakal

बोलून बातमी शोधा

Glenn Maxwell

बेभान झालेल्या नेटकऱ्यांना मॅक्सवेलनं झोडपलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) नावाला साजेसा खेळ केला. पण त्याची ही कामगिरी संघाला जेतेपदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत टिकवून ठेवू शकली नाही. एलिमिनेटर लढतीत कोलकाता नाइटरायडर्स (KKR) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ला 4 विकेट राखून पराभूत केले. या सामन्यातील पराभवसह बंगळुरुचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. एलिमिनेटर लढतीत ग्लेन मॅक्सवेल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. एवढेच नाही तर गोलंदाजीतही त्याला चमक दाखवता आली नाही.

सामन्यानंतर सोशल मीडियावर काही नेटकरी आरसीबी आणि संघातील खेळाडूंना ट्रोल करत आहेत. ट्विटरवर रॉयलफिक्सरचॅलेंजर्स नावाचा हॅशटॅग दिसून आला. या हॅशटॅगच्या माध्यमातून काहीजण विराट कोहलीच्या संघासह खेळाडूंना अपशब्दात ट्रोल करण्यात येत आहे. जे लोक आक्षेपार्ह शब्दांत संघावर निशाणा साधत आहेत, त्यांची मॅक्सवेलनं शाळा घेतली आहे.

सामन्यानंतर काही वेळातच मॅक्सवेलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. समर्थकांचे आभार मानताना त्याने ट्रोलर्संना खडेबोल सुनावले आहेत. मॅक्सवेलने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आरसीबीसाठी यंदाचा हंगाम सर्वोत्तम होता. जिथे पर्यंत जायला हवे होते तिथे पर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही. आम्ही आमच्या परिने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, असेही मॅक्सवेलनं म्हटले आहे.

सोशल मीडियावर असभ्य वर्तन करण्यापेक्षा सभ्यतेचं दर्शन घडवून आणा. आम्हाला ज्या चाहत्यांनी प्रोत्साहन दिले त्याचे खूप खूप आभार. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून भयावह आणि आक्षपार्ह शब्दांत व्यक्त होत आहेत. कृपया त्यांनी हा प्रकार थांबवावा. जर तुम्ही माझ्या सहकाऱ्यांसंदर्भात सोशल मीडियावर अपशब्दांचा वापर कराल तर सर्वजण मिळून तुम्हाला ब्लॉक करू, अशी धमकीच मॅक्सवेलनं ट्रोलर्संना दिली आहे.

ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल यंदाच्या हंगामात आरसीबीकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 42.75 च्या सरासरीने 15 सामन्यात 513 धावा केल्या. 16 षटकात 135 धावा खर्च करुन 3 विकेटही त्याच्या नावे जमा झाल्या.

loading image
go to top