
IPL 2021 : गंभीरनं काढली CSK सह धोनीतील खोट
IPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला रविवार पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. गंभीरने चेन्नई सुपर किंग्जमधील उणीवा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या टप्प्यात संघाला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल, असे गंभीरला वाटते. एवढेच नाही तर त्याने कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या फलंदाजीवरही आक्षेप घेतला. धोनी जलदगतीने धावा करण्यात अपयशी ठरतोय, असा उल्लेखही गंभीरने केला आहे.
गंभीरने स्टार स्पोर्ट्सवरील 'गेम प्लॅन' कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी तो म्हणाला की, 'एमएस धोनी 4 किंवा 5 क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज आहे. पण पहिल्या टप्प्यात धोनी 6 किंवा 7 क्रमांकावर खेळताना पाहायला मिळाले. काही वेळा धोनीने सॅम कुरेनला आपल्या जागी पाठवून बढती दिली. यातून धोनी नेतृत्व आणि विकेट किपरच्या भूमिकेत दिसतो. या रणनितीमुळे धोनीला बॅटिंगवेळी 8 ते 10 चेंडू मिळाले तर तो मोठे फटके खेळू शकतो. पण सध्याच्या परिस्थितीत त्याच्यासाठी हे सहज सोपे नाही.
हेही वाचा: IPL 2021 : विराट कोहली RCB ची कॅप्टन्सीही सोडेल?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतोच. आयपीएल स्पर्धा ही इतर लीगप्रमाणे नाही. या स्पर्धेत दर्जेदार गोलंदाजांचा समावेश असतो. यंदाच्या हंगामात CSK समोर आघाडीच्या फलंदाजांची मोठी समस्या असेल, असेही गंभीरने म्हटले आहे.
हेही वाचा: IPL साठी अभेद्य 'बायो-बबल' कवच; 750 + खेळाडू आणि स्टाफ मेंबर्सची कोरोना टेस्ट
कोहली आणि एबीवर असेल दबाव
आयपीएलमध्ये पहिली वहिली ट्रॉफी उंचावण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसंदर्भातही गंभीरने भाष्य केले. RCB मध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे तगडे फलंदाज आहेत. मॅक्सवेल नसता तरी एबीच्या रुपात त्यांच्याकडे तगडा फलंदाज आहे. त्याच्याकडे जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाचा मारा सहज परतवून लावण्याची क्षमता आहे. संघ जेतेपदासाठी संघर्ष करत असल्यामुळे एबी आणि विराट दोघांवर दबाव निश्चित असेल, असे मतही गंभीरने व्यक्त केले.
Web Title: Ipl 2021 Goutam Gambhir On Csk And Ms Dhoni Batting Order
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..