IPL 2024 mi vs srh : मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची आस ; हार्दिक पंड्या-पॅट कमिन्सचे नेतृत्व पणाला

पाच वेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत उद्या (ता. २७) सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. मुंबई व हैदराबाद या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत थोड्याशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
IPL 2024 mi vs srh
IPL 2024 mi vs srhsakal

हैदराबाद : पाच वेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत उद्या (ता. २७) सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. मुंबई व हैदराबाद या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत थोड्याशा फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे दोन्ही संघांना या वेळी पहिल्या विजयाची आस असणार आहे.

गुजरातविरुद्धच्या लढतीत मुंबईसमोर विजयासाठी अखेरच्या सहा षटकांमध्ये ४८ धावांचे आव्हान होते; मात्र त्यानंतरही सहा धावांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईची आयपीएलच्या मोसमाची सुरुवात बहुतांशी वेळा निराशाजनक असते; मात्र आता स्पर्धेमध्ये दहा संघांचा सहभाग आहे. त्यामुळे छोट्याशा फरकाने झालेला पराभवही पुढे जाऊन महागात पडू शकतो. कर्णधार रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस यांची शानदार फलंदाजी व जसप्रीत बुमराची प्रभावी गोलंदाजी ही मुंबईच्या पहिल्या लढतीचे वैशिष्ट्य ठरली; पण मुंबईला इतर बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा करावी लागणार आहे.

इशान किशनसाठी यंदाचा आयपीएल मोसम हा महत्त्वाचा ठरणार आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून त्याला वगळण्यात आले आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये भारतीय संघात पुनरागमन करावयाचे असल्यास त्याला आयपीएलमध्ये चमक दाखवावीच लागणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्या सलामीच्या लढतीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. गुजरातकडून खेळताना तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असे. मुंबईकडून खेळतानाही त्याने फलंदाजी क्रमात बदल करायला हवा.

IPL 2024 mi vs srh
IPL 2024, CSK vs GT: चेन्नईच्या चेपॉकवर ऋतुच्याच शिलेदारांचे 'राज', गुजरातविरुद्ध मिळवला सर्वात मोठा विजय

मुलानी, चावलाकडून आशा

मुंबईचा सलामीच्या लढतीत फक्त सहा धावांनी पराभव झाला असला, तरी गोलंदाजीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागणार आहे. जसप्रीत बुमरा व जेराल्ज गोएत्झी या वेगवान गोलंदाजांनी ठसा उमटवला; पण शम्स मुलानी व पियूष चावला या फिरकी गोलंदाजांना चमक दाखवता आली नाही. त्यांच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची आशा आहे.

फलंदाजांना खेळ उंचवावा लागेल

कोलकाताकडून हैदराबादला सलामीच्या लढतीत चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. हेनरिच क्लासेन (६३ धावा) वगळता हैदराबादच्या इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. मयांक अगरवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी व अब्दुल समद या भारतीय फलंदाजांना अस्तित्व दाखवून द्यावे लागणार आहे. एडन मार्करमकडूनही अपेक्षा आहेत.

कमिन्स, यान्सेन, भुवीच्या खेळावर मदार

हैदराबादच्या संघात कर्णधार पॅट कमिन्स, मार्को यान्सेन व भुवनेश्‍वरकुमार हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे या तीन खेळाडूंवर या संघाची मदार आहे. भुवनेश्‍वरच्या गोलंदाजीवर सलामीच्या लढतीत धावांचा पाऊस पाडण्यात आला. पण त्याच्याकडे पुरेसा अनुभव असल्यामुळे यामधून भुवी नक्कीच बाहेर येईल.

आजची लढत

मुंबई इंडियन्स - सनरायझर्स हैदराबाद

स्थळ - हैदराबाद, वेळ - संध्याकाळी ७.३० वाजता

प्रक्षेपण - स्टार क्रिकेट, जिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com