IPL 2024 : आयपीएलची धुळवड आजपासून ; पहिल्या टप्प्यात १७ दिवसांत २१ सामन्यांची मेजवानी

देशभरात होळी पोर्णिमा आणि रंगपंचमी याचा उत्साह रंग भरू लागलेला असताना या उत्सवांच्या दोन दिवस अगोदरपासूनच आयपीएलची धुळवड सुरू होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना आयपीएलचा रोमांच आणि उत्साह मात्र पहिल्या सामन्यापासून टिपेला पोहोचणार, हे निश्चित.
IPL 2024
IPL 2024sakal

चेन्नई : देशभरात होळी पोर्णिमा आणि रंगपंचमी याचा उत्साह रंग भरू लागलेला असताना या उत्सवांच्या दोन दिवस अगोदरपासूनच आयपीएलची धुळवड सुरू होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना आयपीएलचा रोमांच आणि उत्साह मात्र पहिल्या सामन्यापासून टिपेला पोहोचणार, हे निश्चित. भारतीयांसाठी आयपीएल हा सर्वात मोठा क्रिकेटोत्सव. १० संघ सत्तरच्या वर सामने, असा नेहमीचा फॉरमॅट असला, तरी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलची दुसऱ्या टप्प्यातील इनिंग कधी सुरू होणार, हे निश्चित झालेले नाही; मात्र उद्यापासून पुढील १७ दिवसांत २१ सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. यातील तीन रविवारी तर डबल धमाका, म्हणजेच दोन सामने होणार आहेत.

गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा बार उडेल. या दोन संघांतील या लढतीमुळे अर्थात महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली सलामीलाच आमने-सामने येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील या कार्यक्रमात प्रत्येक संघ किमान चार सामने खेळणार आहे. यातील दोन-दोन सामने त्यांच्या होमग्राऊंडवर होणार आहेत. त्यामुळे १० शहरांत आयपीएलचे नगारे जोरात वाजतील.

विराट उंचावणार का करंडक ?

आयपीएलची १६ वर्षे झाली; परंतु विराट कोहलीला एकदाही करंडक जिंकता आलेला नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर असला, तरी त्याचा बंगळूर संघ विजेता ठरण्यास अपयशी ठरलेला आहे. काही मोसमापासून विराटने कर्णधारपदही सोडलेले आहे. अपत्यप्राप्तीसाठी क्रिकेटपासून बरेच महिने दूर असलेला विराट त्यानंतर प्रथमच मैदानात उतरेल.

IPL 2024
CSK IPL 2024 : धोनीपर्व अस्ताकडे... ; मराठमोळा ऋतुराज चेन्नईचा कर्णधार

रिषभ पंतवर लक्ष

रिषभ पंत कठोर प्रयत्न आणि मेहनत घेऊन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतत आहे. दिल्ली कॅपिटल संघाचे तो पुन्हा नेतृत्व करणार आहे; परंतु सर्वाधिक लक्ष तो कसा खेळ करतो, यापेक्षा त्याची तंदुरुस्ती किती सक्षम झाली आहे, याची उत्सुकता असणार आहे. तो पूर्ण बरा झालेला असल्याचे सिद्ध झाल्यास ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड होऊ शकते.

रोहित आणि हार्दिक

मुंबईला पाच वेळा अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व देण्यात आले. हा बदल मुंबईच्या अनेक चाहत्यांना पटलेला नाही. याची जाणीव स्वतः हार्दिकलाही आहे. रोहितप्रमाणे हार्दिकही आयपीएल विजेता कर्णधार आहे. आपण मुंबई संघालाही विजेतेपद मिळवून देऊ शकतो हे सिद्ध करण्यास तोही सर्वस्व पणास लावेल.

शुभमन गिलचे नेतृत्व

हार्दिक पंड्या गुजरातकडून मुंबई संघात गेल्यामुळे गुजरातच्या कर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली. शुभमनकडे भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आयपीएलमधील त्याच्या नेतृत्वगुणांवर निवड समिती आणि बीसीसीआयचेही लक्ष असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com