MI vs RCB : मुंबईच्या विजयाचा सूर्य तळपला; जसप्रीत बुमराचा पाच विकेटचा दणका

जसप्रीत बुमरा (५/२१) याने भेदक गोलंदाजी केल्यानंतर इशान किशन (६९ धावा) व सूर्यकुमार यादव (५२ धावा) यांनी झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सात विकेट व २७ चेंडू राखून धुव्वा उडवला.
ipl 2024 mi vs rcb jasprit bumrah ishan suryakumar fifty cricket
ipl 2024 mi vs rcb jasprit bumrah ishan suryakumar fifty cricketSakal

Mumbai News : जसप्रीत बुमरा (५/२१) याने भेदक गोलंदाजी केल्यानंतर इशान किशन (६९ धावा) व सूर्यकुमार यादव (५२ धावा) यांनी झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सात विकेट व २७ चेंडू राखून धुव्वा उडवला. मुंबईने सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली. बंगळूरचा हा पाचवा पराभव ठरला.

बंगळूरकडून मुंबईसमोर १९७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. इशान किशन व रोहित शर्मा या सलामी जोडीने नवव्या षटकात १०१ धावा फटकावत इरादे स्पष्ट केले. इशानच्या झंझावातात बंगळूरच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. त्याने ३४ चेंडूंमध्ये सात चौकार व पाच षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. आकाशदीपच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

दरम्यान, याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या; पण जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर तो तीन धावांवरच इशान किशनकरवी झेलबाद झाला.

आकाश मधवालने विल जॅक्सला आठ धावांवर बाद करीत बंगळूरला दुसरा धक्का दिला. यानंतर मात्र फाफ ड्युप्लेसी व रजत पाटीदार या जोडीने ८२ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न केला. जेराल्ड कोएत्झी याने पाटीदारला किशनकरवी झेलबाद केले. या लढतीत पाटीदारने २६ चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांसह ५० धावांची खेळी केली. अखेर तो फॉर्ममध्ये आला.

फिरकी गोलंदाज श्रेयस गोपालने ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर पायचीत बाद करीत मोठा अडसर दूर केला; पण ड्युप्लेसी व दिनेश कार्तिक यांनी बंगळूरचा डाव सावरला. दोघांनी अप्रतिम फलंदाजी केली. ड्युप्लेसीने ४० चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. बुमराने त्याला बाद केले.

कार्तिक व बुमरा चमकले

बंगळूर फलंदाजी करीत असताना अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिक व जसप्रीत बुमरा चमकले. कार्तिकने २३ चेंडूंमध्ये नाबाद ५३ धावांची खेळी साकारताना पाच चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली. याचदरम्यान बुमराने महिपाल लोमरोर, सौरव चौहान व विजयकुमार वैशाखला बाद करीत ठसा उमटवला. बंगळूरने १९६ धावांपर्यंत मजल मारली.

सूर्याचा झंझावात

इशान बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट खेळाडू सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला. त्याने अवघ्या १९ चेंडूंमध्ये पाच चौकार व चार षटकारांसह ५२ धावांची धडाकेबाज खेळी केली. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर रोहित ३८ धावांवर बाद झाला. विजयकुमार वैशाखने सूर्यकुमारला बाद केले. हार्दिक पंड्या (नाबाद २१ धावा) व तिलक वर्मा (नाबाद १६ धावा) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - २० षटकांत ८ बाद १९६ धावा (फाफ ड्युप्लेसी ६१, रजत पाटीदार ५०, दिनेश कार्तिक नाबाद ५३, जसप्रीत बुमरा ५/२१) पराभूत वि. मुंबई इंडियन्स १५.३ षटकांत ३ बाद १९९ धावा (इशान किशन ६९, सूर्यकुमार यादव ५२).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com