IPL News : हार्दिक पंड्याच्या सेनेचा हा पाचवा विजय

मुंबई इंडियन्स पूर्णत: निष्प्रभ; ५५ धावांनी पराभव
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्याsakal

अहमदाबाद : मुंबई इंडियन्सचा संघ मंगळवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत पूर्णत: निष्प्रभ ठरला. गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ५५ धावांनी धुव्वा उडवला. हार्दिक पंड्याच्या सेनेचा हा पाचवा विजय ठरला.

शुभमन गिल (५६ धावा), डेव्हिड मिलर (४६ धावा) व अभिनव मनोहर (४२ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे गुजरात टायटन्सने २०७ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर राशीद खान (२/२७), नूर अहमद (३/३७) या अफगाणिस्तानच्या फिरकी जोडगोळीच्या प्रभावी कामगिरीसमोर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

गुजरातकडून मुंबईसमोर २०८ धावांचे आव्हान उभे ठाकले. कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन या जोडीला या लढतीत शानदार सुरुवात करून देता आली नाही. इशान व कॅमेरुन ग्रीन या जोडीने मुंबईची धावसंख्या ४३पर्यंत नेली. पण २००च्यावर धावसंख्येचा पाठलाग करीत असताना सातत्याने आक्रमक फलंदाजी करावी लागते. राशीद खानच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना इशान जोश लिटलकरवी १३ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कॅमेरुन ग्रीन (३३ धावा) व सूर्यकुमार यादव (२३ धावा) यांनी थोडीफार झुंज दिली. मात्र दोघांनाही नूर याने बाद करीत मुंबईला आणखी संकटात टाकले.

दरम्यान, याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्जुन तेंडुलकरने रिद्धीमान साहाला ४ धावांवरच यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. त्यानंतर शुभमन गिल व कर्णधार हार्दिक पंड्या या जोडीने ३८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने पियूष चावलाला गोलंदाजीस आणले.

त्याच्या गोलंदाजीवर लाँग ऑफवरून षटकार मारण्याच्या नादात हार्दिक पंड्या सूर्यकुमार यादवला झेल देऊन बाद झाला. हार्दिकने १३ धावा केल्या. कर्णधार बाद झाल्यानंतरही गिलने आपली धडाकेबाज खेळी कायम ठेवली. त्याने ३४ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ५६ धावांची खेळी साकारली. या मोसमातील त्याचे तिसरे अर्धशतक ठरले. या लढतीत मुंबईकडून खेळण्याची संधी मिळालेल्या कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळताना गिल बाद झाला.

गुजरातने १२व्या षटकात तिसरा फलंदाज गमावला. याप्रसंगी त्यांच्या धावा होत्या ९१. त्यानंतर अनुभवी लेगस्पिनर पियूषने विजय शंकरला १९ धावांवर बाद केले. गुजरातची अवस्था ४ बाद १०१ धावा अशी झाली असताना डेव्हिड मिलर व अभिनव मनोहर या जोडीने त्यांचा डाव सावरला. दोघांनी ७१ धावांची भागीदारी रचली. या दरम्यान दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

अभिनव याने २१ चेंडूंमध्ये ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. रायली मेरेडीथने त्याला बाद करीत जोडी तोडली. मिलर व राहुल तेवतिया या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये दे दणादण फटकेबाजी केली. २२ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी साकारणाऱ्या मिलरला जेसन बेहरनडॉर्फने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तेवतियाने नाबाद २० धावा केल्या. गुजरातने २० षटकांमध्ये ६ बाद २०७ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स २० षटकांत ६ बाद २०७ धावा (शुभमन गिल ५६, डेव्हिड मिलर ४६, अभिनव मनोहर ४२, पियूष चावला २/३४) विजयी वि. मुंबई इंडियन्स २० षटकांत ९ बाद १५२ धावा (कॅमेरुन ग्रीन ३३, सूर्यकुमार यादव २३, नेहल वाधेरा ४०, नूर अहमद ३/३७).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com