बाद फेरीच्या आव्हानासाठी हैदराबादला बंगळूरवर विजय आवश्यक

वानखेडे स्टेडियमवर आज भरदुपारी होणाऱ्या सामन्यात बंगळूर आणि हैदराबाद यांच्यात बाद फेरी गाठण्यासाठी चुरस
IPL Today Match SRH vs RCB
IPL Today Match SRH vs RCB

IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर आज भरदुपारी होणाऱ्या सामन्यात बंगळूर आणि हैदराबाद यांच्यात बाद फेरी गाठण्यासाठी चुरस तर असेलच; परंतु या दोन्ही संघांतून खेळणारे विश्वविख्यात फलंदाज विराट कोहली आणि केन विल्यम्सन यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. क्रिकेटविश्वातील या दोन महान फलंदाजांचा सूर यंदाच्या आयपीएलमध्ये हरपलेला आहे. कोहलीला ११ सामन्यांतून २१.६० च्या सरासरीने २१६; तर विल्यम्सनला १० सामन्यांतून २२.११ च्या सरासरीने १९९ धावाच करता आलेल्या आहेत. हे दोघेही मूळचे मधल्या फळीचे फलंदाज, परंतु संघरचनेसाठी आणि स्वतःच्या फॉर्मसाठीही सलामीला खेळत आहेत. आयपीएलचे साखळी सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आता तरी यांचा फॉर्म संघाच्या वाटचालीसाठी फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा केली जात आहे.(IPL Today Match SRH vs RCB)

गुजरातविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक करून विराटने फॉर्ममध्ये येत असल्याची झलक दाखवली होती; पण त्यानंतरच्या चेन्नईविरुद्धच्या लढतीत तीन चौकार आणि एक षटकार अशी आक्रमकता दाखवल्यानंतर विराटला मोठे फटके मारता येत नव्हते. एकेरी धावांवर भर दिल्यामुळे धावपळीत त्याने धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेलला धावचीत केले आणि स्वतः शेवटी ३३ चेंडूत ३० धावा करून बाद झाला होता. विल्यम्सन हा उंच फटकेबाजी करणारा फलंदाज नसला, तरी त्याचा स्ट्राईक रेट उत्तम असतो. चांगल्या सुरुवातीचा फायदा त्याला यंदा घेता आलेला नाही. त्याचा परिणाम संघावर होत आहे.

सलग पाच विजय मिळवल्यानंतर हैदराबादला सलग तीन पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. बाद फेरीसाठी आव्हान कायम ठेवण्याकरिता त्यांना आजचा सामना जिंकावा लागणार आहे. हैदराबादला खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले आहे. वॉशिंग्टन सुंदरनंतर हुकमी वेगवान गोलंदाज टी. नटराजन दुखापतग्रस्त झाला आहे. आता मार्को जेन्सनला उद्याच्या सामन्यात खेळवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसेल.

बंगळूरचा उडवला होता ६८ धावांत धुव्वा

हैदराबाद आणि बंगळूर यांच्यात यंदा दुसरा साखळी सामना होणार आहे. पहिल्या लढतीत हैदराबादने बंगळूरचा ६८ धावांत धुव्वा उडवला होता. आजही अशाच कामगिरीची अपेक्षा त्यांना असेल; मात्र बंगळूरचा संघ हिशेब चुकते करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

उमरानकडून विविधता अपेक्षित

एकापेक्षा एक वेगवान चेंडू टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा उमरान मलिक दिल्लीविरुद्धच्या सामन्यात भलताच महागडा ठरला होता. आता विकेट घेण्यासाठी त्याच्याकडून विविधतेची अपेक्षा संघाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com