IPL 2024 : 'गंभीर'ची KKR प्ले-ऑफमध्ये मारणार एन्ट्री की पांड्याची MI घालणार खोडा? जाणून घ्या कोणाचे पारडे जड

अवघ्या चार विजयांसह आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ आज (ता. ११) आयपीएल लढतीत कोलकता नाईट रायडर्सचा सामना करणार आहे.
Kolkata Knight Riders face Mumbai Indians IPL 2024
Kolkata Knight Riders face Mumbai Indians IPL 2024sakal;

Kolkata Knight Riders face Mumbai Indians IPL 2024 : अवघ्या चार विजयांसह आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ आज (ता. ११) आयपीएल लढतीत कोलकता नाईट रायडर्सचा सामना करणार आहे. कोलकता संघाने आठ विजयांसह १६ गुणांची कमाई केली असून आता नवव्या विजयाला गवसणी घालून प्ले-ऑफमधील प्रवेश निश्‍चित करण्यासाठी त्यांचा संघ लढताना दिसणार आहे. याप्रसंगी मुंबई इंडियन्सचा संघ अडथळा ठरणार की कोलकता संघ तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये पोहोचणार याचे उत्तर ईडन गार्डन स्टेडियमवर आज मिळेल.

मुंबईच्या संघाने बारा सामन्यांमधून आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केलेला आहे. त्यामुळे मुंबईचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आहे. उर्वरित दोन लढतींमध्ये मुंबईचा संघ काय कमावणार, असा प्रश्‍न या वेळी उभा ठाकला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उर्वरित दोन लढतींमध्ये विजय मिळवून पुढल्या मोसमासाठी आत्मविश्‍वास या संघाला कमावता येणार आहे.

२०२० आयपीएल याच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. चेन्नईचा संघ २०२० मध्ये आठ संघांचा सहभाग असलेल्या मोसमात सातव्या स्थानावर राहिला. चेन्नई संघाने या मोसमात अखेरच्या काही लढतींमध्ये ऋतुराज गायकवाडला सलामी फलंदाज म्हणून संधी दिली. त्यानंतर कायापालट झाला. चेन्नईने २०२१ व २०२३ मध्ये विजेता होण्याचा मान संपादन केला. ऋतुराजनेही फलंदाजीत पुढे पाऊल टाकले. आता तर त्याच्या खांद्यावर चेन्नई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मुंबई संघाला यामधून शिकता येणार आहे.

रोहित, हार्दिकचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा

मुंबईच्या संघातील खेळाडूंवर भारतीय संघाची नजर असणार आहे. रोहित शर्मा याने बारा सामन्यांमधून ३३० धावा केल्या खऱ्या, पण मागील काही लढतींमध्ये त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झालेली आहे. हार्दिक पंड्याला तर १९८ धावाच करता आल्या आहेत. या मोसमातील त्याची सर्वोच्च खेळी ४६ धावांची आहे. या दोन्ही खेळाडूंचा फॉर्म भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एक जूनपासून वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन होत असून रोहित व हार्दिक उर्वरित दोन लढतींमध्ये चमकल्यास टीम इंडियासाठी आनंदाची बाब असणार आहे.

नॉनस्टॉप बुमरावरही नजरा

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने मुंबईसाठी बाराही सामने खेळले आहेत. त्याने ६.२० च्या इकॉनॉमी रेटने १८ फलंदाजही बाद केले आहेत. टी-२० विश्‍वकरंडकाकडे लक्ष देता त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे, पण तरीही त्याला विश्रांती देण्यात येणार नाही. त्यामुळे मुंबई संघाची गोलंदाजीची मदार पुन्हा एकदा बुमरावर असणार आहे. हार्दिक पंड्या, पीयूष चावला यांच्याकडून दमदार प्रदर्शनाची आशा असेल.

सुनील नारायण, फिल सॉल्टचा शानदार फॉर्म

कोलकता संघाने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात (मेंटॉर) यंदाच्या मोसमात लक्षणीय कामगिरी केलेली आहे. सुनील नारायण (४६१ धावा) व फिल सॉल्ट (४२९ धावा) या सलामीवीरांनी धावांचा पाऊस पाडला आहे. साहजिकच दोघांकडून अशाच खेळाची आशा असणार आहे. श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रीश रघुवंशी, आंद्रे रसेल हे दिमतीला असतील.

गोलंदाज फॉर्ममध्ये

कोलकता संघातील गोलंदाजही फॉर्ममध्ये आले आहेत. वरुण चक्रवर्ती (१६ विकेट), सुनील नारायण (१४ विकेट), हर्षित राणा (१४ विकेट), आंद्रे रसेल (१३ विकेट) यांनी कोलकता संघासाठी प्रभावी कामगिरी केलेली आहे. आतापर्यंतच्या मोसमात ठसा उमटवता न आलेल्या मिचेल स्टार्कनेही मागील काही लढतींत धमक दाखवली आहे. त्यानेही आता १२ फलंदाज बाद केले आहेत. मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे काम कोलकताच्या गोलंदाजांना करावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com