LSG vs CSK : लुईसने दुबेला धुतले; चेन्नई जिंकलेला सामना हरली

Lucknow Super Giant Defeat Chennai Super Kings celebrate IPL 2022 season first win
Lucknow Super Giant Defeat Chennai Super Kings celebrate IPL 2022 season first winESAKAL

एव्हिन लुईसने 19 व्या षटकात शिवम दुबेला तब्बल 25 धावा चोपून गेलेला सामना लखनौच्या पारड्यात टाकला. लखनौने चेन्नईचा सहा विकेट्सनी पराभव करत हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. लुईसने 23 चेंडूत अर्धशतक ठोकले. लखनौने सीएसकेचे 211 धावांचे आव्हान 19.3 षटकातच पार केले. लुईसने नाबाद 55 धावा ठोकल्या. तर क्विंटन डिकॉकने 61 धावांची खेळी केली. त्याला केएल राहुलने 40 धावा करुन चांगली साथ दिली. (Lucknow Super Giant Defeat Chennai Super Kings celebrate IPL 2022 season first win)

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 211 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंटने दमदार सुरूवात केली. लखनौचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी 10 षटकात 99 धावांची सलामी दिली. हे दोघे मैदानावर असताना लखनौ सामना बिनबादच जिंकते की काय असे वाटत होते.

मात्र 10 षटकानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. प्रेटोरियसने 40 धावा करणाऱ्या राहुलला बाद करत सलामी जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या मनिष पांडेला तुषार देशपांडेने अवघ्या 5 धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. त्यानंतर प्रेटोरियसने पुन्हा एकदा सेट फलंदाज गळाला लावला. त्याने 45 चेंडूत 61 धावा चोपणाऱ्या क्विंटन डिकॉकची बॅट शांत केली. मात्र लखनौच्या एव्हिन लुईस आणि दीपक हुड्डाने आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. मात्र धावांचे आणि चेंडूतील अंतर वाढत चालले होते. त्यातच दीपक हुड्डा ब्रोव्होच्या गोलंदाजीवर बाद झाला.

मात्र लुईसने एकहाती किल्ला लढवत 19 व्या षटकात तब्बल 25 धावा चोपल्या. लुईसने 23 चेंडूत अर्धशतक ठोकून हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्यानंतर 6 चेंडूत 9 धावांची गरज असताना लखनौने 19.3 षटकातच 211 धावा करत सामना जिंकला. लुईस बरोबर बदोनीने 9 चेंडूत 19 धावा चोपल्या.

दरम्यान, लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत मोठ्या धावसंख्येचा पाया घातला. सलामीवीर रॉबिन उथप्पाने 27 चेंडूत 50 धावा चोपल्या. त्यानंतर मोईन अलीने 35 तर शिवम दुबेने 49 धावांची खेळी करत सीएसकेला 150 च्या पार पोहचवले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीने स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली आणि संघाला 200 चा टप्पा पार करून दिला. धोनीने 6 चेंडूत 16 धावा चोपल्या तर रविंद्र जडेजाने 9 चेंडूत 17 धावा केल्या. लखनौकडून आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com