IPL 2024 : सुमार गोलंदाजी अन् सामान्य नेतृत्व; सुनील गावसकर यांच्याकडून हार्दिक पंड्याचा समाचार

चेन्नईविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी व्हिलन ठरलेल्या हार्दिक पंड्यावर सर्वत्र टीका होत आहे.
mi captain hardik pandya criticized over loose sunday csk vs mi ipl 2024
mi captain hardik pandya criticized over loose sunday csk vs mi ipl 2024Sakal

मुंबई : चेन्नईविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी व्हिलन ठरलेल्या हार्दिक पंड्यावर सर्वत्र टीका होत आहे. माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी तर हार्दिकची क्षुल्लक अशा शब्दांत गणना केली आहे. हार्दिकची गोलंदाजी अतिशय सुमार आणि नेतृत्वही तेवढेच साधारण असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे.

दूरचित्रवाणीवर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याच्यासह समालोचन करताना वानखेडे स्टेडियमवरील सामन्यानंतर गावसकर यांनी खडे बोल सुनावले. मुळात प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांच्या हुर्योमुळे बेजार झालेला हार्दिक मानसिकदृष्ट्या अस्थिर झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच सोशल मीडियावर होत असलेल्या टीकांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे.

वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात चेन्नईला दोनशे धावांच्या आत रोखण्याची मुंबई संघाला संधी होती; परंतु हार्दिक पंड्याने अखेरच्या (२० व्या) षटकासाठी स्वतःकडे गोलंदाजी घेतली आणि त्याने तब्बल २६ धावा दिल्या.

यातील २० धावा तर ४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीने चोपून काढल्या. अखेर चेन्नईने हा सामना बरोबर २० धावांनी जिंकल्यामुळे हार्दिकला व्हिलन ठरवण्यात आले आहे. हार्दिकची गोलंदाजी अतिशय सुमार होती, तेवढ्याच सुमार दर्जाचे त्याचे नेतृत्व होते.

ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही चेन्नईचा डाव १८५ ते १९० पर्यंत रोखता आला असता, पण पंड्याने स्वतःकडे गोलंदाजी घेतली आणि सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

इतकी सुमार गोलंदाजी मी गेल्या अनेक सामन्यांत पाहिलेली नाही, असे सुमार चेंडू मिळाले असते तर मीही षटकार मारले असते. एखादा षटकार आपण समजू शकतो, पण समोरचा फलंदाज त्याच्या आवाक्यात मिळालेला चेंडू षटकार मारणार हे माहीत असतानाही टप्प्यावर चेंडू टाकावा?

हे कमी नाही तर तिसरा चेंडू फुलटॉस... समोर धोनी फलंदाजी करतोय याचा विसर त्याला कसा पडला, अशा शब्दांत गावसकर यांनी हार्दिकच्या गोलंदाजीचा ‘समाचार’ घेतला.

या सामन्यात हार्दिकने २ षटकांत तब्बल ४३ धावा दिल्या, त्यानंतर फलंदाजीतही त्याला काहीच योगदान देता आले नाही. संघाला गरज असताना तो सहा चेंडूंत केवळ दोनच धावा करू शकला.

हार्दिक पंड्याच्या चुका

- वेगवान गोलंदाज आकाश मधवालचे एक षटक शिल्लक होते

- फिरकी गोलंदाज श्रेयस गोपालने आपल्या पहिल्या षटकात विकेट मिळवल्यानंतरही त्याला गोलंदाजी नाही.

- धोनीला बॅटच्या पुढ्यात चेंडू (एक चेंडू तर फुलटॉस)

रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यापासून हार्दिकला प्रेक्षकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. वानखेडेवर प्रत्येक सामन्यात त्याची हुर्यो उडवली जात होती; परंतु बंगळूरविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने प्रेक्षकांना आपल्या कृतीतून ‘असे करू नका’ असा सल्ला दिला आणि लगेचच चित्र बदलले होते, आता पुन्हा हार्दिकला प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

हार्दिककडून उसने अवसान

सामन्याअगोदरचा मैदानावरचा वावर असो वा नाणेफेकीचा क्षण असो, हार्दिक पंड्या आपण फारच खुष आणि समाधानी आहोत असे भासवण्यासाठी उसने अवसान आणून हसत असतो, पण प्रत्यक्ष मात्र तो मनातून नाराज आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या विरोधाचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. त्याची मानसिकता मी मैदानावर नाणेफेकीच्या वेळी जाणली आहे, असे केविन पीटरसनने म्हटले आहे.

कोणत्याही संघाविरुद्ध खेळताना एक ठराविक रणनीती आखली जाते, पण मैदानावर जर ही रणनीती यशस्वी होत नसेल तर ‘प्लान बी’ तयार केलेला असतो आणि त्याचा वापर केला जातो; परंतु चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हार्दिककडे ‘प्लान बी’ तयारच नव्हता, असे दिसून येत असल्याचे पीटरसन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com