
IPL 2022: चेन्नईला लय सापडणार का? वानखेडे स्टेडियमवर पंजाबशी लढत
मुंबई : यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या दोन संघांमध्ये आज मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये लढत रंगणार आहे. पंजाब किंग्ज-चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे गतविजेता चेन्नई सुपरकिंग्जचा संघ तिसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, तर दुसरीकडे मागील सलग दोन लढतींतील पराभवांना मागे सारून चौथा विजय मिळवण्यासाठी पंजाब किंग्जचा संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करील. (IPL Today’s Match)
एकूणच काय तर दोन्ही संघ उद्या लय मिळवण्यासाठी झुंजतील. महेंद्रसिंग धोनीच्या जबरदस्त कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्जने नवी मुंबईतील लढतीत मुंबई इंडियन्सला हरवण्याची करामत करून दाखवली; पण या संघातील खेळाडूंकडून सातत्याने चमकदार कामगिरी होत नाही. ऋतुराज गायकवाडला अद्याप सूर गवसलेला नाही. शिवम दुबे (२३९ धावा), रॉबिन उथप्पा (२२७ धावा) यांनी प्रत्येकी २ अर्धशतके झळकावली आहेत; पण यापुढील लढतींमध्ये या दोघांनाही खेळ उंचवावा लागेल.
गोलंदाजीत चेन्नई सुपरकिंग्जला अपयशाला सामोरे जावे लागले आहे. ड्वेन ब्राव्होने १२ फलंदाजांना बाद करीत चुणूक दाखवली आहे. माहीत थिकशाना (७ बळी), मुकेश चौधरी (७ बळी), रवींद्र जडेजा (५ बळी) यांना कामगिरीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.
Web Title: Pbks Vs Csk Match Who Will Win Todays Match Punjab Kings Vs Chennai Super Kings Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..