
MI vs RR : 'सूर्या'ची बॅट तळपली अन् मुंबईच्या विजयाची पहाट उजाडली
मुंबई : अखेर मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात विजयाचा मुहूर्त निवडलाच. तोही आपला कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाचा. मुंबईने राजस्थानचे 159 धावंचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.2 षटकातच पार केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतकी (51) खेळी केली. त्याला तिलक वर्माने 35 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर शेवटच्या काही षटकात सामना रोमहर्षक स्थितीत पोहचला होता त्यावेळी टीम डेव्हिडने 20 धावांची आक्रमक खेळी करून मुंबईचा विजय निश्चित केला. राजस्थान कडून जॉस बटलरने दमदार फलंदाजी करत 67 धावांची खेळी केली. मुंंबईकडून शोकीन, मॅरेडिथने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. (Suryakumar Yadav Half Century Mumbai Indians Register 1st Victory In IPL 2022)
राजस्थानचे 159 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरूवात खराब झाली. आर अश्विनने पॉवर प्लेमध्येच रोहित शर्माला अवघ्या 2 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर बोल्टने इशान किशनला 26 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला.
मुंबईचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी मुंबईचे 13 व्या षटकात मुंबईचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान, सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने तिलक वर्मा सोबत तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली.
मात्र मुंबईच्या 122 धावा झाल्या असताना युझवेंद्र चहलने सूर्यकुमारला 51 तर प्रसिद्ध कृष्णाने तिलक वर्माला 35 धावांवर बाद केले. यामुळे मुंबईचे टेन्सन वाढले. अखेर डेवाल्ड ब्राविसच्या जागी आलेल्या सिंगापूरच्या टीम डेव्हिडने 18 व्या षटकात आक्रमक फटकेबाजी करत सामना 12 चेंडूत 12 धावा असा आणला. अखेर मुंबईने 159 धावांचे आव्हान 19.2 षटकात पार करत आपला हंगामातील पहिला विजय साजरा केला.
आयपीएलच्या 44 व्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथ गोलंदाजी करण्याचा निर्णय घतेला. ऋतिक शोकीनने राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला 15 धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र 7 चेंडूत 16 धावा केल्यानंतर कुमार कार्किकेयने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
त्यानंतर आलेला डॅरेल मिचेलही 16 धावांची भर घालून परतला. मात्र राजस्थानचा सालामीवीर जॉस बटलरने आपला गिअर बदलला. त्याने शौकीनच्या एकाच षटकात 4 षटकार ठोकत संघाला 126 धावांपर्यंत पोहचवले. मात्र शौकीनने त्याला याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले.
बटलर बाद झाल्यानंतर अश्विनने 9 चेंडूत 21 धावा ठोकत संघाला 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. अखेर राजस्थानचा डाव 20 षटकात 6 बाद 158 धावांवर संपला.
Web Title: Suryakumar Yadav Half Century Mumbai Indians Register 1st Victory In Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..