
कोहली स्वतःची बिजनेस क्लास सीट अनुष्का ऐवजी गोलंदाजांना का द्यायचा?
विराट कोहली (Virat Kohli) सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. त्याचा आयपीएलमधील खराब फॉर्म त्याच्या चाहत्यांच्या मनला वेदाना देणारा ठरत आहे. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटर विवेक राजदान (Vivek Razdan) यांनी भारताच्या या माजी कर्णधाराबद्दल एक किस्सा सांगितला. हा किस्सा विमानातील बिजनेस क्लास सीटचा आहे. (Business Class Seat)
ज्यावेळी भारतीय संघ सामने खेळण्यासाठी विमानाने प्रवास करतात त्यावेळी संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यासाठी बिजनेस क्लासच्या दोन सीट आरक्षित केल्या जातात. राजदान यांनी सांगितल्यानुसार विराट कोहलीने कधीही या बिजनेस क्लासचा वापर केला नाही. तो जरी संघाचा कर्णधार असला तरी तो कायम आपली बिजनेस क्लासची सीट गोलंदाजांना द्यायचा.
राजदान म्हणाले की, 'विमानातील दोन बिजनेस क्लासच्या सीट कायम आरक्षित असायच्या. त्यातील एक कर्णधाराची आणि दुसरी प्रशिक्षकाची असायची. पण मी विराट कोहलीला कधी बिजनेस क्लासमधून प्रवास करता पाहिलेले नाही. तो कायम आपल्या संघासोबत इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करायचा. प्रशिक्षक सोडले तर बिजनेस क्लासच्या सीटवर कायम एक गोलंदाज (Bowler) बसलेला असायचा. त्या सीटवर इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी कधी कधी रवीचंद्रन अश्विन असायचा. त्याला कायम वाटायचे की गोलंदाज हे मैदानावर जास्त मेहनत करतात त्यामुळे निदान तीन चार तास का असेना त्यांना आराम मिळाला पाहिजे.'
विवेक राजदान पुढे म्हणाले की, 'ज्यावेळी वेस्ट इंडीजचा 2019 चा दौरा होता. त्यावेळी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील संघासोबत होती. मात्र त्यावेळी विराट आणि अनुष्का दोघांनीही इकॉनॉमी क्लास मधून प्रवास केला. विराटने त्याची बिजनेस क्लासची सीट अनुष्काला देण्यात यावी अशी मागणी केली नाही.'