'स्टारडम' रैनाच्या डोक्यात गेलं; चेन्नई संघमालकाचा 'स्ट्रेटड्राइव' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina, MS Dhoni, IPL2020

'स्टारडम' रैनाच्या डोक्यात गेलं; चेन्नई संघमालकाचा 'स्ट्रेटड्राइव'

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 13 वा हंगाम युएईत रंगणार आहे. 19 सप्टेंबरपासून रंगणाऱ्या स्पर्धेसाठी सहभागी 8 संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. जैव सुरक्षिततेच्या नियमाचे पालन केल्यानंतर संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जंचा स्टार खेळाडू स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच माघारी परतला आहे. त्याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता यामागचे आणखी एक धक्कादायक कारण समोर आले आहे. संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. याशिवाय त्यांनी रैनाच्या निर्णयावर कठोर शब्दांत  नाराजी  व्यक्त केली आहे.    

कोरोनाच्या धास्तीमुळेच रैनाने घेतली IPL स्पर्धेतून माघार

'आउटलुक'च्या वृत्तानुसार, हॉटेल व्यवस्थेसंदर्भात रैना नाराज होता. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रैनाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो मायदेशी परतण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. मुलाखतीमध्ये श्रीनिवासन म्हणाले की, रैनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे धक्का बसला असला तरी धोनी परिस्थिती सांभाळून घेईल, यावर विश्वास आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या घडीला  क्रिकेटर्सचा मिजास हा अभिनेत्याप्रमाणे असतो, अशा शब्दांत त्यांनी रैनाला खडेबोल सुनावले. चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व वरिष्ठ खेळाडू एकत्र राहण्याला प्राधान्य देतात, असा उल्लेखही त्यांनी केला.

IPL 2020 : 1988 जणांची कोविड चाचणी, 2 खेळाडूंसह 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

काही वेळा यश डोक्यात जाते..
श्रीनिवासन पुढे म्हणाले की,  रैना एपिसोडमधून संघ सावरला आहे. जर कोणी समाधानी नसेल तर त्याचा निर्णय घेण्यात ते सक्षम आहेत. आम्ही कोणावरही दबाव आणत नाही. यश मिळाल्यानंतर स्टारडम काहीवेळा डोक्यात जाते, असा उल्लेख करत त्यांनी रैनावर नाव न घेता तोफ डागली. कर्णधार धोनीसह संघासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला असून सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे सांगितले आहे, असेही ते म्हणाले. 

रैनाला पगार मिळणार नाही 
माजी आयसीसी अध्यक्षांनी रैना परत येईल, असा विश्वासही व्यक्त केलाय. अद्याप स्पर्धा सुरु झालेली नाही. स्पर्धेत न खेळल्यास त्याला वेतन दिले जाणार नाही.  11 कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेल याची जाणीव झाल्यावर रैना निर्णय बदलेल, असा अंदाजही त्यांनी बांधला. पठाणकोटमधील नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्यामुळे रैनाने स्पर्धेतून माघार घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.  

तब्बल 150 दिवसानंतर विराटने सहकाऱ्यांसोबत केली फटकेबाजी

काय आहे संपूर्ण प्रकरण?
चेन्नई सुपर किंग्जचा संघ 21 ऑगस्टला दुबईमध्ये दाखल झाला होता. हॉटेल रुममधील व्यवस्थेवर रैना नाखुश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमधील व्यवस्था अपूरी आहे, असे त्याला वाटत होते. त्याला धोनीप्रमाणे रुम हवी होती. त्याच्या रुममध्ये हवी तशी  बाल्कनी नव्हती. दरम्यान संघातील दोन खेळाडूंना  कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. जलदगती गोलंदाज  दीपक चाहर आणि यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋतूराज गायकवाड या दोघांसह 13 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे रैनाची कोरोनाबाबतची भिती आणखी वाढली.  

टॅग्स :Cricket