गुणवत्ता सिद्ध करण्याची पंतसाठी योग्य वेळ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

तिन्ही प्रकारच्या खेळासाठी असलेली प्रतिभासंपन्न गुणवत्ता यशस्वीपणे सादर करण्याची रिषभ पंतसाठी योग्य वेळ आली आहे, असे विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ट्‌वेंटी-20 सामन्याच्या अगोदर केले. 

लॉडरहील, फ्लोरिडा - तिन्ही प्रकारच्या खेळासाठी असलेली प्रतिभासंपन्न गुणवत्ता यशस्वीपणे सादर करण्याची रिषभ पंतसाठी योग्य वेळ आली आहे, असे विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ट्‌वेंटी-20 सामन्याच्या अगोदर केले. 

महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत अनिश्‍चितता असल्याने रिषभ पंतला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती मिळत आहे, त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दौऱ्यात तिन्ही प्रकारांत निवड समितीने पंतला प्राधान्य दिले आहे. पंतला आता भरपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे सर्व प्रकारांतील आपली क्षमता सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे कोहलीने सांगितले. 

पंतमध्ये किती गुणवत्ता आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु भारतीय संघाला आता त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची आवश्‍यकता आहे. महेंद्रसिंह धोनीचा अनुभव नेहमीच निर्णायक ठरत असतो, परंतु पंतसारख्या खेळाडूने आता पुढे जायला हवे, असे कोहलीने आवर्जून सांगितले. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन ट्‌वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने विचार सुरू करणार आहे. ऑस्ट्रेलियातील या विश्‍वकरंडक स्पर्धेस जाण्यापर्यंत आम्ही 25 ते 26 टी-20 सामने खेळणार आहोत. या प्रत्येक सामन्यातून आम्हाला योग्य पर्याय तपासायचे आहेत. पुढे जाऊन आम्हाला सर्वोत्तम 15 खेळाडू तयार करायचे आहेत आणि त्यातून अंतिम 11 खेळाडू सज्ज करता येईल, असे कोहली म्हणाला. 

संघ व्यवस्थापनाने नवोदित खेळाडूंवर भरवसा दाखवलेला आहे. तसेच आयपीएल खेळल्यामुळे दडपणाचा सामना करण्याची ताकद नवोदितांमध्ये आलेली आहे, अशी पुष्टी विराटने जोडली. 

संघातील नवोदित खेळाडूंनी क्षमता दाखवून दिलेली आहे. आयपीएलमुळे प्रत्येक जण व्यावसायिक झाला आहे. कोणत्याही दडपणाच्या वेळी चेंडू दिला तर प्रत्येक जण आव्हान स्वीकारण्यास सज्ज असतो. ट्‌वेंटी-20 संघासाठी आयपीएलमुळे अनेक पर्याय मिळत असतात, पण त्यातून सर्वोत्तम 15 खेळाडू तयार करायचे असतात आणि या प्रत्येकाकडून मॅच विनिंग कामगिरी करण्याची अपेक्षा असते. 
- विराट कोहली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is time for Rishabh Pant to present the quality successfully said Virat Kohli