Joginder Sharma: निवृत्तीची घोषणा करताना फसला! जोगिंदरची ढापाढापी आले अंगलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

joginder sharma retirement copy murali vijay

Joginder Sharma: निवृत्तीची घोषणा करताना फसला! जोगिंदरची ढापाढापी आले अंगलट

Joginder Sharma Retirement Copy : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्यावहिल्या ट्वेंन्टी-20 विश्वकरंडक विजेतेपदाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटक टाकणारा जोगिंदर शर्मा याने क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती स्वीकारली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना पत्र लिहून आपली निवृत्ती जाहीर करताना जोगिंदर म्हणतो, 2007 ते 2017 हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला प्रवास अविस्मरणीय होता. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले हे आपले भाग्य आहे.

या घोषणेवर जोगिंदरला आणखी एक शुभेच्छा मिळाल्या, तर दुसरीकडे अशी चूक पकडली गेली, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि हसायला आले. पाच दिवसांपूर्वीच निवृत्त झालेल्या मुरली विजयचे शब्द जोगिंदरने कॉपी करून घेतले. मुरली विजयने आपले वक्तव्य सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मग जोगिंदरने आपले पोस्ट करताच, त्याचे प्रत्येक पत्र विजयची प्रत होते. फक्त संघांची नावे (राज्य आणि आयपीएल) वेगळी होती.

टीम इंडियाचा माजी कसोटी सलामीवीर 30 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाला. 2018 मध्ये विजयने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकचा कर्णधार मिसबा उल हक बहरात आला होता, अंतिम षटकात पाकला १३ धावांची गरज होती. अखेरचे षटक कोणाला द्यायचे, असा प्रश्न धोनीकडे होता. अनुभवी हरभजनची षटके शिल्लक होती; परंतु धोनीने जोगिंदरला आक्रमणावर लावले आणि त्याने मिसबाला बाद करून भारताला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले होते.

जोगिंदर केवळ चारच सामने भारताकडून खेळला; परंतु टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील अंतिम षटक ही त्याची सर्वाधिक मोठी मिळकत ठरली. जोगिंदर त्यानंतर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमधून आयपीएलचे चार मोसम खेळला. प्रत्यक्षात त्याला १६ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.