esakal | IPL 2021 : गळती लागली! इंग्लंडच्या त्रिकूटाची स्पर्धेतून माघार
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021 : गळती लागली! इंग्लंडच्या त्रिकूटाची स्पर्धेतून माघार

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 : भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामना रद्द करण्यात आला. या निर्णयानंतर बीसीसीआय (BCCI) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात अंतर्गत मतभेद सुरु असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगते आहे. आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देत भारतीय संघाने अखेरची कसोटी खेळणं टाळल्याचा गवगवा ब्रिटन प्रसारमाध्यमांनी केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा निकाल काय? यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना इंग्लंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाहीत, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.

ही चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या तिघांनी दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad ) सलामीवीर जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), पंजाब किंग्जच्या (Punjab Kings )ताफ्यातील गडी डेविड मलान (Dawid Malan ) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) ताफ्यातून खेळणाऱ्या क्रिस वोक्सने (Chris Woakes) वैयक्तिक कारण देत स्पर्धेतील उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडचा आडमुठेपणा; विराटचा प्रस्ताव नाकारला

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना बेयरस्ट्रो आणि मलान आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाहीत, या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे द गार्डियनच्या वृत्तानुसार वोक्सही स्पर्धेत सहभागी होणार नाही.

यापूर्वी जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी युएईत रंगणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा फटका बसणार आहे. जोस बटलरने ही वैयक्तिक कारण देत स्पर्धेत खेळणार नसल्याचे म्हटले होते. दुसरीकडे स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटची सामन्यादरम्यान भारतीय संघातील स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक मुद्दे चर्चेत असताना इंग्लंडच्या आणखी तीन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

loading image
go to top