तुला सोडत नाही तू फक्त बाहेर ये... सौरव गांगुलीनं पाकच्या शोएबला धमकावलं | Sourav Ganguly Shoaib Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly Shoaib Malik

Sourav Ganguly Shoaib Malik : तुला सोडत नाही तू फक्त बाहेर ये... सौरव गांगुलीनं पाकच्या शोएबला धमकावलं

Sourav Ganguly Shoaib Malik : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या आशिया कपच्या आयोजनावरून टशन सुरू आहे. पाकिस्तान आशिया कप 2023 हा पाकिस्तानातच खेळवण्याबाबत आग्रही आहे तर भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे आजी माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक चकमकी उडत आहेत.

याचदरम्यान पाकिस्तानचा माजी विकेटकिपर कामरान अकमलने 2005 मधील कसोटी मालिकेतील एक किस्सा सांगितला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानावर देखील मैत्रीपूर्ण संबंध दिसत असले तरी यापूर्वी झालेल्या अनेक सामन्यात दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांवर सर्रास स्लेजिंग करताना दिसत होते.

कामरानने नादीर अली पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर बोलताना सौरव गांगुली, शोएब मलिक यांचा 2005 ला झालेल्या मोहाली कसोटीतील एक भन्नाट किस्सा सांगितला. यावेळी दादा कसा शोएब मलिकवर भडकला होता हे त्याने सांगितले.

कामरान म्हणाला की, '2005 मध्ये मोहाली कसोटीत दानिश कनेरिया गोलंदाजी करत होता. शोएब मलिक सिली मिड-ऑन आणि सलमान बट्ट सिली मिड-ऑफला उभे होते. दानिशची लाईन लेथं भरकटली आणि सौरव गांगुलीने या चेंडूवर चौकार मारला. यावेळी शोएब मलिक बडबडला की, बघ कामरान दादावर किती दबाव आहे. षटकाराचा चेंडू चौकार मारला.'

अकमल पुढे सांगतो की, 'सौरव गांगुली पुढच्याच चेंडूवर षटकार मारण्यासाठी स्टेप आऊट झाला मात्र तो हुकला आणि स्टम्पिंग झाला. गांगुलीने मैदान सोडण्यापूर्वी मलिकला दमच भरला. तू खूप हुशार आहेस तू बाहेर ये मी तुला सोडणार नाही.'

हा किस्सा मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी घडला. मात्र कामरान म्हणतोय तसं गांगुली कनेरियाच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग नाही तर झेलबाद झाला होता. हा कसोटी सामना ड्रॉ झाला होता.

(Sports Latest News)