'ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप खेळायचा असेल तर...'; कपिल देव यांचा धोनीला गुरुमंत्र

MSD_Kapil_Dev
MSD_Kapil_Dev

नोएडा : आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात उत्सुकता असली तरी, कपिलदेव मात्र फार उत्साही नाहीत. आयपीएल ही नवोदितांसाठी प्रभाव पाडण्याकरिता आहे. धोनीला जर आगामी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळायचे असेल, तर त्याने त्या अगोदरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायला हवे, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे. 

आयपीएलचे वारे देशात वाहू लागले असून, धोनी 2 मार्चपासून सराव सुरू करणार आहे. भारताला दोन विश्‍वकरंडक जिंकून देणारा 38 वर्षीय धोनी इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आल्यानंतर मैदानावर दिसलेला नाही. श्रेणीनुसार मानधन करारातूनही त्याला वगळण्यात आलेले आहे. 

प्रत्येकाला समान न्याय हवा 

आयपीएल फक्त धोनीच खेळणार आहे असे नाही. पुढील 10 वर्षांत भारतीय क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू या आयपीएलमधून कसे सापडतील, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. धोनीने अगोदरच देशासाठी खूप काही केले आहे, असे सांगून कपिल म्हणाले, धोनीचा चाहता म्हणून त्याला ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना पाहायला मला आवडेल; पण क्रिकेटपटू म्हणून मी सर्वच बाबींचा विचार करेन. जवळपास वर्षभर तो खेळलेला नाही. त्यामुळे संघात पुन्हा येण्यासाठी त्याने अगोदर इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळायला हवे, वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे परिमाण लावणे योग्य नाही. 

बुमराबाबत चिंता नको 

न्यूझीलंड दौऱ्यात अपयशी ठरत असलेल्या जसप्रीत बुमराबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे कपिलदेव म्हणतात. एक चांगला स्पेल त्याला पुन्हा फॉर्मात आणू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त होण्यास काही काळ लागतो. जसे फलंदाजाला फॉर्मात येण्यास एखादी खेळी पुरेशी ठरते, तसे गोलंदाजाला एखादा भन्नाट स्पेल पुरेसा आहे. 

ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या 

सातत्याने खेळत असल्यामुळे ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या, असा थेट सल्ला कपिलदेव यांनी टीम इंडियाला दिला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी थेट स्टेडियम ते स्टेडियम असा प्रवास करावा लागला, तसेच वर्षातील सामने, प्रवास असा वर्षातील 300 दिवस व्यस्त कार्यक्रम असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले होते.

या संदर्भात बोलताना कपिलदेव यांनी आयपीएलमधून ब्रेक घ्या, असे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर जे खेळाडू टीम इंडियातून सर्व प्रकारांत खेळतात, त्यांनी आयपीएलमधून विश्रांती द्यावी, असा 'प्रस्ताव' दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com