भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहे. केदारने आजपासून राजकीय इनिंग सुरू केली आहे. त्याने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आता केदार जाधवनेही राजकारणात एण्ट्री केली आहे.
मुंबईतील भाजपाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना केदार जाधव म्हणाला, "२०१४ पासून, जेव्हापासून भाजप सरकार केंद्रात सत्तेत आले, तेव्हापासून त्यांना मिळालेले प्रेम आणि पाठिंबा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीमुळे मला खूप प्रेरणा मिळते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी मी जे काही छोटे योगदान देऊ शकेन, ते देण्याचा माझा उद्देश आहे. मला जी कोणतीही जबाबदारी मिळेल, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा पूर्ण विश्वास आहे..."