'किंग कोहली'ची विराट खेळी; विंडीजसमोर 280 धावांचे लक्ष्य

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अय्यरने जणू आपण मधल्या फळीतीलच नव्हे तर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहोत हे दाखवताना हुशारीने एकेरी धावा घेतल्या आणि जम बसलेल्या विराट कोहलीस आक्रमणाची संधी दिली.​

पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीस अखेर चौथ्या क्रमांकावर कोण या प्रश्‍नाचे उत्तर त्याच्यासमोरच गवसले. मुंबईकर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारतीय डाव कोसळणार असे वाटत असतानाच कोहलीस तोलामोलाची साथ दिली, त्यामुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 बाद 279 अशी भक्कम धावसंख्या उभारली. 

वेस्ट इंडीजने शिखर धवनला पहिल्याच षटकात पायचीत केले आणि त्यानंतर रोहीत शर्मा आणि रिषभ पंत यांचा जम बसला असे वाटले, त्यावेळीच त्यांना बाद केले. जम बसलेल्या विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही त्यामुळे भारताची सुरवात 22.2 षटकांत 3 बाद 101 अशी झाली होती. त्याचवेळी श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्याने विराट कोहलीच्या सहकाऱ्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याने चेंडूस धाव या गतीने अर्धशतक करताना केवळ चार चौकार मारले होते. त्याने स्ट्राइक रोटेट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. 

अय्यरने जणू आपण मधल्या फळीतीलच नव्हे तर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहोत हे दाखवताना हुशारीने एकेरी धावा घेतल्या आणि जम बसलेल्या विराट कोहलीस आक्रमणाची संधी दिली. त्याचवेळी जम बसल्यावर धावगतीस वेग दिला. त्यामुळे कोहली-अय्यर जोडीच्या शतकी भागीदारीत षटकामागे धावांची गती क्वचितच सहापेक्षा कमी होती. आश्‍चर्य म्हणजे चौकार, षटकारांची आतषबाजी न करता हे घडत होते. विजय शंकर, अंबाती रायुडू यांच्यापेक्षा आपणच योग्य आहोत, हेच अय्यरची जणू बॅट बोलत होती. 42 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. मात्र, थोड्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा सुरू झाला.

विराट कोहली माघारी परतल्यानंतर, मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाजांनी विकेट फेकण्यास सुरुवात केली. विराट 120 धावा काढून ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार हे खेळाडूही ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाज धावा जमवू शकले नाहीत. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने 3 तर शेल्डन कॉट्रेल-जेसन होल्डर आणि रोस्टन चेसने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

संक्षिप्त धावफलक 
भारत 50 षटकांत 7 बाद 279 (विराट कोहली 120 -125 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 71-68 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) 

खेळ आकड्यांचा
- कोहलीचे 42 वे शतक 
- कोहलीच्या विंडीजविरुद्धच्या वन-डेतील दोन हजार धावा 34 सामन्यांतच 
- कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांमध्ये गांगुलीस टाकले मागे 
- विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम. मियॉंदादला टाकले मागे 
- अय्यरचे सहा डावांतील तिसरे अर्धशतक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: King Kohlis century 280 target before the West Indies