
KL Rahul : केएल राहुलला डच्चू मात्र नवा उपकर्णधार कोण होणार? BCCI समोर आहेत हे 3 पर्याय
KL Rahul Test Vice Captain : बीसीसीआयच्या निवडसमितीने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी नुकतीच संघाची घोषणा केली. पहिल्या दोन कसोटी सामने खेळलेल्या संघात निवडसमितीने फारसा बदल कलेला नाही. भारताचा सलामीवीर केएल राहुल जरी खराब फॉर्ममधून जात असला तरी त्याच्या संघातील स्थानाला धक्का लागलेला नाही. मात्र त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. राहुलसाठी हा इशारा समजला जात आहे.
दरम्यान, केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयच्या निवडसमितीने संघाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत कोणताही घोषणा केली नाही. त्यामुळे रोहित शर्माचा डेप्युटी कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद कोणाकडे याणार याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. या रेसमध्ये तीन नावे आघाडीवर आहेत. पहिले म्हणजे फिरकीपटू आर. अश्विन, दुसरे म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि तिसऱ्या नाव चर्चेत आहे ती श्रेयस अय्यरचे!
1 रविचंद्रन अश्विन
भारताची हुशार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन हा केएल राहुलनंतर टीम इंडियाचा उपकर्णधार होण्यासाठी सर्वात लायक खेळाडू आहे. अश्विनचे क्रिकेटिंग माईंड हे जगविख्यात आहे. याचबरोबर संघातील त्याचे स्थान देखील मोठे आहे. त्याचा कसोटी क्रिकेटमधील अनुभव देखील दांडगा आहे. अश्विनने आयपीएलध्ये नेतृत्व देखील केले आहे. अश्विन गेल्या 13 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय.
2 चेतेश्वर पुजारा
गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यावर जेव्हा रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी खेळू शकला नव्हता तेव्हा राहुलने कर्णधारपद भूषवले होते. त्यावेळी चेतेश्वर पुजारा उपकर्णधार होता. 100 कसोटी खेळणाऱ्या पुजाराने कधीही टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवलेले नाही. त्याला काही वेळाच टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची संधी मिळाली आहे. पण ही जबाबदारी पेलण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे पुजाराला ही संधी मिळू शकते.
3 श्रेयस अय्यर
भारताचा 28 वर्षीय श्रेयस अय्यर हा कसोटीतील उपकर्णधारांच्या पर्यायांपैकी एक सर्वोत्तम पर्याय आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहेत तर आयपीएलमध्ये देखील तो आधी दिल्ली कॅपिटल्स आता केकेआरचे नेतृत्व करत आहे. तो तीनही फॉरमॅट खेळला आहे. तो तरूण आहे. त्याने 7 वर्षानंतर दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफमध्ये पोहचवले होते. त्यामुळे भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावर त्याची दावादेरी असणारच आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!