World Cup 2023 : गुरु द्रविडचा विश्वास ठरवला खरा, राहुलचे यश टीम इंडियाचा टर्निंग पॉइंट

World Cup 2023 kl Rahul
World Cup 2023 kl Rahul sakal

World Cup 2023 kl Rahul : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत चालवत असलेल्या कारचा भीषण अपघात झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात पोकळी निर्माण झाली. के. एल. राहुललाही दुखापत झाल्यानंतर यष्टिरक्षकाची भूमिका कोण सांभाळणार, असा प्रश्‍नही याप्रसंगी निर्माण झाला; मात्र बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत के. एल. राहुलच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले आणि तो विश्‍वकरंडकापर्यंत एकदम तंदुरुस्त झाला. विश्‍वकरंडकात त्याने फलंदाजीसह यष्टिरक्षकाची भूमिकाही चोख बजावली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडूनही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

World Cup 2023 kl Rahul
Ind vs Aus Final: फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर नजरा! पिच क्युरेटरने दिली मोठी माहिती

भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का ३० डिसेंबर रोजी बसला जेव्हा रिषभ पंतला खूप भयानक अपघात झाला. नंतर १ मे २०२३ रोजी दुसरा धक्का बसला जेव्हा आयपीएल मोसमातील सुरुवातीचा सामना खेळत असताना के. एल. राहुलला दुखापत झाली. भारतीय संघाच्या दृष्टीने दोनही धक्के भयानक होते. कारण दोघे खेळाडू एकदिवसीय आणि टी२० संघातील यष्टिरक्षक होते. भारतीय संघाने के. एस. भरत आणि संजू सॅमसन दोघांना संधी दिली; पण अपेक्षित परिणाम साधता आला नाही. चिंता वाढू लागली कारण एकदिवसीय विश्वकरंडक तोंडावर आला होता. रिषभ पंत बरा होणे केवळ अशक्य होते, म्हणून के. एल. राहुलला तंदुरुस्त करायला पुढील काही महिने घड्याळाविरुद्धची शर्यंत चालू झाली.

सुदैवाने के. एल. राहुल बंगळूरचा असल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ठाण मांडून दुखापतीतून सावरण्याचे प्रयत्न घरी राहून करणे शक्य झाले. अकादमीतील निष्णात प्रशिक्षकांनी खरोखर कमाल सुनियोजित मेहनत के. एल. राहुलकडून करून घेतली. आशिया स्पर्धेसाठी के. एल. राहुलची निवड झाली तेव्हा बहुतांशी लोकांना वाटले, की भारतीय संघ व्यवस्थापन इतका आग्रह के. एल. राहुलसाठी का धरते आहे. आशिया स्पर्धेत आला असतानाही के. एल. राहुल अजून पूर्ण विश्वासाने तयार झाला नव्हता. त्यातून श्रेयस अय्यरला सरावादरम्यान दुखापत झाल्याने के. एल. राहुलला अचानक खेळावे लागले.

त्याने पाकिस्तानसमोर भन्नाट फलंदाजी करून सामना जिंकायला मदत केली. तेव्हापासून के. एल. राहुलने मागे वळून बघितले नाही.विश्‍वकरंडक सुरू असताना हार्दिक पंड्याला दुखापत झाली आणि के. एल. राहुलला यष्टिरक्षण आणि फलंदाजी बरोबर उपकप्तानपदाची जबाबदारी सोपवली गेली. त्याने चालू स्पर्धेत भन्नाट फलंदाजी केली जी अपेक्षित होती. खरा सुखद आश्चर्याचा धक्का त्याने अफलातून यष्टिरक्षण करून दिला आहे. वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यावर त्याने पकडलेले झेल भल्या भल्या पंडितांना चकित करून गेले आहेत. के. एल. राहुलच्या चांगल्या कामगिरीने दुसरा राहुल म्हणजे राहुल द्रविड जाम खूश आहे. कारण जवळपास अशीच जबाबदारी राहुल द्रविडने २००३ विश्वचषक स्पर्धेत पार पाडली होती.

दुखापतीतून सावरताना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत के. एल. राहुल कडून यष्टिरक्षणाचा वेगळा सराव मोठ्या प्रमाणात करून घेतला होता, ज्याचा फायदा झालेला स्पष्ट दिसतो आहे. या स्पर्धेत त्याने एका शतकासह ३८६ धावा केल्या आहेत. तसेच यष्टिरक्षक म्हणून १५ झेल आणि १ यष्टिचीत केले आहे. याच भन्नाट कामगिरीमुळे दोन वेळा राहुलच्या गळ्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचे मेडल पडले आहे. संघाच्या गरजेप्रमाणे खेळात बदल करत जबाबदारी पार पाडणारा के. एल. राहुल आता अंतिम सामन्यासाठी निर्णायक कामगिरी करायला सज्ज होतो आहे. के. एल. राहुल याने विश्‍वकरंडकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत नाबाद ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नेदरलँड्‌सविरुद्धच्या लढतीत त्याने झंझावाती फलंदाजी करताना १०२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com