कोहलीच्या मताचा आदर करायला हवा - कपिल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीपासून कर्णधार विराट कोहलीला दूर ठेवले असले, तरी त्याने व्यक्त केलेल्या मताचा आदर करायला हवा असे मत प्रशासक निवड समितीचे प्रमुख कपिलदेव यांनी गुरुवारी व्यक्त केले आहे. 

कोलकता - भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीपासून कर्णधार विराट कोहलीला दूर ठेवले असले, तरी त्याने व्यक्त केलेल्या मताचा आदर करायला हवा असे मत प्रशासक निवड समितीचे प्रमुख कपिलदेव यांनी गुरुवारी व्यक्त केले आहे. 

आमची समिती प्रशिक्षक निवडीचे काम चोख बजावेल असेही कपिलदेव यांनी सांगितले. ते म्हणाले,""विंडिीज दौऱ्यावर जाताना प्रशिक्षकाविषयी जे काही कोहली म्हणाला, हे त्याचे मत होते. कर्णधारच नाही, तर प्रत्येकाच्या मताचा आम्हाला आदर करायला हवा. आम्ही प्रशिक्षक निवडीचे काम चोख पार पाडू.'' 

प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत संपून गेली आहे. यामध्ये अर्ज न करता शास्त्री प्रशिक्षकाच्या शर्यतीत आले आहेत. आमची समिती सर्व अर्जांचा विचार करून योग्य निर्णय घेईल असेही ते म्हणाले. 

कपिलदेव यांना गुरुवारी ईस्ट बंगाल क्‍लबच्या वतीने "भारत गौरव' या सन्मानाने गौरविण्यात आले. त्या वेळी त्यांनी ईस्ट बंगालने देशातील फुटबॉल परंपरा जपल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले,""आपला देशच परंपरेचा आहे. परंपरा नसती, तर आपल्याला बंगाली, पंजाबी, साऊथ इंडियन, तमिळी अशी ओळख मिळालीच नसती. अशीच परंपरा खेळाला आहे. म्हणूच आपण विंबल्डनचा आदर करतो. त्यांनी टेनिस ग्रास कोर्टवर खेळण्याची परंपरा जपली आहे.'' 

क्‍लबच्या शंभर वर्षाच्या परंपरेचा गौरव करताना कपिलदेव यांनी मॅराडोनाचाही उल्लेख केला. ते म्हणाले,""मॅराडोना हे फुटबॉलपटूंचे दैवत आहे. जेव्हा मॅराडोना चेंडू पायात खेळवत असतो, तेव्हा तो सर्वांत वेगवान असतो. त्यावेळी तो धावपटूंपेक्षाही वेगवान वाटतो.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohli opinion should be respected says Kapil Dev