महापुराच्या काळजीवर मनातील जिद्दीची मात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

त्याच्या गावाला पूराच्या पाण्याने अद्यापही वेढलेले आहे, पण तो जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत पदकाची आशा बाळगून आहे. मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील, पण काही वर्षांपासून पुण्यात शिकत असलेल्या विजय पाटीलला जागतिक स्पर्धेच्या चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हार पत्करावी लागली, पण त्याला रिपेचेजद्वारे पदकाची संधी असेल.

मुंबई : त्याच्या गावाला पूराच्या पाण्याने अद्यापही वेढलेले आहे, पण तो जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत पदकाची आशा बाळगून आहे. मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील, पण काही वर्षांपासून पुण्यात शिकत असलेल्या विजय पाटीलला जागतिक स्पर्धेच्या चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हार पत्करावी लागली, पण त्याला रिपेचेजद्वारे पदकाची संधी असेल.

भारताचा संघ जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेसाठी रवाना झाला, त्यावेळी कोल्हापूरला पावसाने झोडपण्यास सुरुवात झाली होती, पण विजय त्यानंतरही त्याची फिकीर न करता एस्टोनियातील स्पर्धेस रवाना झाला. त्याने आशियाई कुमार स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, त्यामुळे भारताला जागतिक स्पर्धेत पदकाची आशा होती.

विजय हा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्‍यातील पासरडे गावातील. कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा विजयच्या घरच्यांना थेट फटका बसलेला नाही, पण पंचगंगेला आलेल्या पुरामुळे त्यांच्या गावाला पाण्याने वेढलेले आहे. हे गाव थोडेसे उंचावर आहे, त्यामुळे पाणी शिरलेले नाही, पण तिथे जाणे अशक्‍य झाले आहे, असे विजय पाटीलचे पुण्यातील मार्गदर्शक विजय बराटे यांनी सांगितले.

विजयने बल्गेरियाच्या मेहमेद हसन मेहमेद याला 13-2 असे पराजित करून जोरदार सुरुवात केली, पण त्याला अमेरिकेच्या विताली अरुजऊविरुद्ध 8-10 हार पत्करावी लागली. या लढतीत तो 6-2 असा आघाडीवर होता, पण वितालीने फ्रीस्टाईल गटातील ही लढत जिंकली. आता वितालीने अंतिम फेरी गाठल्यास विजयला रिपेचेजद्वारे संधी असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur wrestler hope for a world medal