IPL 2019 : नाईट रायडर्संचा पंजाबला तडाखा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 मार्च 2019

अश्‍विनच्या चुकीचा रसेलला फायदा 
"मांकडेड' प्रकरणापासून "ट्रोल' होणारा अश्‍विन आजही यातून सुटला नाही. सोळाव्या षटकात इनसाईड सर्कलमधील क्षेत्ररचनेचा त्याचा अंदाज चुकला. त्याने या सर्कलमध्ये तीनच क्षेत्ररक्षक ठेवले. शमीने या वेळी रसेलचा त्रिफळा उडविला. पण, पंचांनी नियमावर बोट ठेवत नो-बॉल ठरवत रसेलला जीवदान दिले.

कोलकता : सलामीच्या फलंदाजापासून मधल्या फळीपर्यंत फलंदाजांनी दिलेल्या तडाख्याने कोलकता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएलमध्ये दुसरा विजय नोंदविला. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव केला. त्यांच्या विजयात रॉबीन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेलची कामगिरी निर्णायक ठरली. 

प्रथम फलंदाजी करताना कोलकता संघाने 4 बाद 218 धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबचा डाव 4 बाद 190 धावा असा मर्यादित राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना लवकर फुटलेली सलामीची जोडी आणि त्यानंतर गेलला रोखण्यात रसेलने मिळविलेले यश पंजाबला मारक ठरले. त्यानंतर मयांक अगरवाल, डेव्हिड मिलर यांनी प्रयत्न केले. पण, आवश्‍यक धावगती वाढल्यावर त्यांच्या आक्रमकतेवर मर्यादा पडल्या आणि येथेच त्यांचा पराभव झाला. 

त्यापूर्वी, प्रत्येक फलंदाजाने केलेल्या फकेबाजीमुळे कोलकता नाईट रायडर्सचे आव्हान प्रत्येक षटकागणिक भक्कम होत गेले. ख्रिश लीन, सुनील नारायण यानी 2.4 षटकांतच 34 धावांची सलामी दिली. पण, दोघे पाठोपाठ बाद झाले. अर्थात, याचा फरक कोलकत्याच्या आक्रमणावर पडला नाही. रॉबिन उथप्पा आणि निशीत राणा यांनी 10 षटकांत 110 धावांचा तडाखा दिला. राणा बाद झाल्याने ही भागीदारी मोडली. त्यानंतर अखेरच्या 33 चेंडूंत कोलकत्याच्या उथप्पा आणि आंद्रे रसेल यांनी 72 धावा कुटल्या. यात रसेलच्या 17 चेंडूंतील 3 चौकार, 5 षटकारांसह केलेल्या 48 धावांचा अधिक वाटा होता. डाव संपण्यास दोन चेंडू असताना रसेल बाद झाला. उथप्पा 67 धावांवर नाबाद राहिला. 

संक्षिप्त धावफलक 
कोलकता नाईट रायडर्स 20 षटकांत 4 बाद 218 (सुनील नारायण 24 -9 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, उथप्पा नाबाद 67 -50 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, नितीश राणा 63 -34 चेंडू, 2 चौकार, 7 षटकार, आंद्रे रसेल 48 -17 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) वि.वि. किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकांत 4 बाद 190 (मयांक अगरवाल 58 -34 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, मिलर नाबाद 59 -40 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, रसेल 2-21) 

अश्‍विनच्या चुकीचा रसेलला फायदा 
"मांकडेड' प्रकरणापासून "ट्रोल' होणारा अश्‍विन आजही यातून सुटला नाही. सोळाव्या षटकात इनसाईड सर्कलमधील क्षेत्ररचनेचा त्याचा अंदाज चुकला. त्याने या सर्कलमध्ये तीनच क्षेत्ररक्षक ठेवले. शमीने या वेळी रसेलचा त्रिफळा उडविला. पण, पंचांनी नियमावर बोट ठेवत नो-बॉल ठरवत रसेलला जीवदान दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolkata knight Riders beats kings xi punjab in IPL 2019