राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख लक्ष्मण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मण

राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख लक्ष्मण होणार; सौरव गांगुली

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या दोन महत्त्वाच्या पदांवर दोन महान क्रिकेटपटूंची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागली असून दुसरीकडे शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या खांद्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याकडून रविवारी याबाबत माहिती देण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या निवडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या चार डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. त्याआधी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण; BCCI च्या बैठकीत चर्चा

याबाबत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले की, भारतात क्रिकेट या खेळाची आणखी प्रगती व्हावी, यासाठी माजी क्रिकेटपटूंचा बीसीसीआयच्या प्रणालीमध्ये समावेश व्हावा, असे सौरव गांगुली यांना वाटते. सौरव गांगुली यांच्यासह बीसीसीआयचे चिटणीस जय शहा यांनीही व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या नावालाच पसंती दाखवली आहे; पण या वेळी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना आपल्या कुटुंबाचा विचार करावा लागला. अखेरचा निर्णयही त्यांचाच होता. राहुल द्रविड व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यामधील समन्वय सर्वश्रुत आहे. भारतीय क्रिकेटला प्रगतिपथावर नेण्यासाठी या दोघांची जोडी निर्णायक भूमिका बजावेल, असे पुढे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सुरुवातीला नाकारला प्रस्ताव

राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर बीसीसीआयकडून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी लक्ष्मण यांच्या नावाचाच विचार सुरू होता; पण सुरवातीला लक्ष्मण यांनी बीसीसीआयकडून समोर ठेवण्यात आलेला प्रस्ताव नाकारला. लक्ष्मण यांचे कुटुंब हैदराबाद येथे वास्तव्याला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य केंद्र हे बंगळूरमध्ये आहे. लक्ष्मण यांना या पदावर रुजू झाल्यानंतर वर्षातील २०० दिवस बंगळूरला रहावे लागणार आहे. याच कारणामुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.

आयपीएल, समालोचन, लेखन सोडावे लागले

बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार एका व्यक्तीला दोन ठिकाणी काम करता येत नाही. त्यामुळे आता लक्ष्मण यांनाही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी इतर करार संपुष्टात आणावे लागत आहेत. आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबाद या संघाचे मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण कार्यरत आहेत. तसेच समालोचन आणि वृत्तपत्र लेखनही ते करीत आहेत.

loading image
go to top