
India's Sports Performance in 2024: प्रेमाचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिसमध्ये भारतीयांच्या वाट्याला अपेक्षाभंग आला असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत पदकासोबतच 'प्रेम' घट्ट करण्यासाठी भारताचे ११० खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले, परंतु पत्यक्षात ६ पदकावरच समाधान मानावे लागले. २०२० मध्ये भारताने ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक ७ पदकं जिंकली होती आणि चार वर्षांनंतर यापेक्षा अधिक पदकं जिंकण्याचा भारताने निर्धार केला होता. पॅरिसमध्ये भारत सहज १० पदकं आणेल असे वाटले होते, परंतु हे 'स्वप्न'च राहिले. काही पदकं थोडक्यात हुकल्याची सल अजूनही मनाला बोचतेय. नेमबाज मनू भाकरने ( Manu Bhaker) ऐतिहासिक कामगिरी करून भारताची जागतिक स्तरावरील इभ्रत वाचवली. नीरज चोप्राने सातत्य कायम राखताना सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले, तर पुरुष हॉकी संघानेही परंपरा कायम राखली. महाराष्ट्रात ७२ वर्षानंतर ऑलिम्पिक पदक घेऊन येण्याचा पराक्रम नेमबाज स्वप्नील कुसाळेने करून दाखवला. खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नीलच्या रुपाने महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक आले.