
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिंपियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नमवित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला.
गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफपर्यंत ताणलेल्या रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजी मारत सुवर्णभेद साधला. याचबरोबर गाथा खडके, वैष्णवी पवार व शर्वरी शेंडे या त्रिकुटाने रिकर्व्ह महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने हरयाणाच्या पारस हुडा व भजन कौर या जोडीला तोडीस तोड लढत दिली. उभय जोड्यांमध्ये एक एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. शेवटी ही लढत ४-४ अशी बरोबरीत सुटल्याने शूट ऑफमध्ये गेली.