esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : पहिलवान, वस्ताद, कीर्तनकार
sakal

बोलून बातमी शोधा

Kautukrao-pawar

या मैदानात फेटेवाले खूपच तुरळक दिसत आहेत. कुस्ती मैदानात काही वर्षांपूर्वी फेटेवाले आणि टोपीवाल्यांची संख्या जास्त असायची; पण आता फेटेवाले लक्ष वेधून घ्यावं एवढे कमी. कौतुकराव दौलतराव पवार असेच एक फेटेवाले कुस्तीशौकिन भेटले.

महाराष्ट्र केसरी 2020 : पहिलवान, वस्ताद, कीर्तनकार

sakal_logo
By
संपत मोरे

या मैदानात फेटेवाले खूपच तुरळक दिसत आहेत. कुस्ती मैदानात काही वर्षांपूर्वी फेटेवाले आणि टोपीवाल्यांची संख्या जास्त असायची; पण आता फेटेवाले लक्ष वेधून घ्यावं एवढे कमी. कौतुकराव दौलतराव पवार असेच एक फेटेवाले कुस्तीशौकिन भेटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुलडाणा जिल्ह्यातील पाडळी गावचे. ‘व्यायामविशारद’ या पदवीने सन्मानित केलेले ऐंशी वर्षांचे कौतुकराव बुलडाणा जिल्ह्यातून आले आहेत. त्यांचं घराणं कुस्तीगिरांचं. वडील बडोदा संस्थानात पहिलवान होते. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे लाडके पहिलवान. वडिलांचा पहिलवानकीचा वारसा कौतुकरावांनी पुढे चालवला. ते स्वतः कुस्तीगीर झाले. गावात तालीम उभारली. कुस्ती वाढली पाहिजे म्हणून धडपड करणारा हा माणूस. या वयातही पोरांना डाव शिकवायला आखाड्यात उतरतो.

ते स्वतः सहा वेळा राज्यपातळीवर खेळले आहेत. ते सांगतात, ‘मी एकूण दोनशे कुस्त्या खेळलो. त्यातील बारा आणे जिंकलो. चार आणे हरलो. कुस्ती हाच आमच्या घराण्याचा वारसा आहे. महाराष्ट्र केसरीचे मैदान कोठेही असो चुकवत नाही.’

पवार त्यांच्या जिल्ह्यात ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जातात. त्यांची वस्तादकी आजही भावते. वस्ताद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौतुकराव यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचाही सहवास लाभला. त्यांच्यासोबत त्यांनी अनेक दौरे केले. तिथूनच त्यांना आध्यात्माची आवड निर्माण झाली.

कुस्ती सुटल्यावर त्यांनी तालमीकडे लक्ष दिले. याच काळात ते कीर्तन शिकले. कीर्तनकार झाले. आसपासच्या गावात कीर्तन करायला जाऊ लागले. लोकांना नामाचा महिमा सांगू लागले.

पहिलवान, वस्ताद आणि कीर्तनकार अशा तीन भूमिका निभावणारा हा माणूस आहे. महाराष्ट्र केसरी मैदानाच्या परिसरात हा फेटेवाला माणूस सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. तरुण मुलं त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढत होते. ‘‘कसं आलाय बाबा?’’ ‘‘एसटीने आलोय.’’ ‘‘एकट्याला यायला जमत का या वयात?’’ ‘‘न जमायला काय हुत. कुस्ती म्हटलं की थकवा पळून जातो.’’

कौतुकराव सोबत मोठी प्रवासी बॅग घेऊन आलेत. त्यांच्या बॅगेत त्यांचे साहित्य आहेत; पण लेमनगोळ्याही आहेत. बोलत बोलत लहान मुलांच्या हातात ते दोन गोळ्या ठेवतात आणि हसतात. ‘‘आमच्याही घरात अशी नातवंड आहेत,’’ असं म्हणत इथं आलेल्या पोरांचेही ते चार दिवसांचे आजोबा झाले आहेत. मग काय या आजोबांना चालताना हात द्यायला अनेक पोरं पुढं येताना दिसत आहेत.