Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचे यजमानपद नगरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra kesari wrestling tournament in nagar maharashtra

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचे यजमानपद नगरला

अहमदनगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद नगर जिल्ह्याला मिळाले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे नगर शहरात दुसऱ्यांदा बलाढ्य पैलवानांचा शड्डू घुमणार आहे. स्पर्धेचे यजमानपद मिळावे, यासाठी पुणे, ठाणे व वेल्हे आदींसह काही कंपन्याही आग्रही होत्या; परंतु स्पर्धा आयोजनाचा मान नगरलाच देण्यात आला. नगरचे कुस्ती वर्तुळ आणि मल्लांसाठी ही आनंदाची बाब आहे. ६५ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती लढत स्पर्धेच्या नियोजनासाठी आज बैठक झाली. त्यात नगरच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणांहून स्पर्धा आयोजनाची मागणी होती; परंतु सर्वांगीण विचार करता नगरचा दावा उजवा ठरला.

यापूर्वी आमदार जगताप यांनी अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. जगताप कुटुंबीय कुस्तीप्रेमी म्हणून परिचित आहे. माजी आमदार अरुण जगताप यांचेही कुस्तीप्रेम सर्वश्रुत आहे. कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. या स्पर्धेत ३४ जिल्हा संघ व ११ महापालिकेचे संघ सहभागी होणार आहेत. विविध गटातील मल्लांनाही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सर्व जिल्हा संघांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यांनी निवडचाचणी स्पर्धा आयोजित केली आहे. नगर जिल्ह्याची चाचणी अकोले शहरात होणार आहे. एका स्पर्धकाला फ्रीस्टाईल किंवा ग्रिको रोमन या प्रकारात खेळता येणार आहे, अशी माहिती जिल्हा संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली. दरम्यान, याआधी महाराष्ट्रातील कुस्ती दोन गटांत विभागली गेली होती. पण उच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आल्यानंतर अखेर महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही मुहूर्त सापडला आहे. यामुळे सध्या तरी महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना आपली धमक दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आमदार संग्राम जगताप यांना स्पर्धा दिली आहे. लवकरच तारीखा जाहीर केल्या जातील. पुणे, ठाणे, वेल्हे येथील संघटना स्पर्धा आयोजनासाठी आग्रही होत्या; परंतु त्यांनी तयारीबाबत कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत. सर्वांगीण विचार केल्यानंतर नगरला ही स्पर्धा दिली आहे. जिल्हा तालिम संघाला सोबत घेऊन स्पर्धा यशस्वी केली जाईल.

- सर्जेराव शिंदे, उपाध्यक्ष, कुस्तीगीर परिषद.