शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra State Wrestling

शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

Maharashtra State Wrestling: शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मविआ सरकार कोसळणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. मविआ सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तोच शरद पवार यांना अजून मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आगामी दिवसांमध्ये ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार असून हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूकसह इतर बाबींवर लक्ष देणार आहे.

याप्रसंगी भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्याकडून आम्हाला म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार सांगितला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते, असे ते स्पष्टपणे म्हणाले.

तक्रारींची दखल

विनोद तोमर पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येत होत्या. जिल्हा संघटना व खेळाडूंनीही आमच्याकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. आमच्याकडून त्यांना संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

संपर्क साधला; पण...

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

तोडगा काढू : सर्जेराव शिंदे

काही गैरसमज झाले असतील. ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत. या प्रकरणावर तोडगा काढू,असे राज्य कुस्तीगीर सघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे सकाळशी बोलताना म्हणाले.

Web Title: Maharashtra State Wrestling Association Dismissed Action Of Indian Association

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top