
Maharashtra Cricket team : महाराष्ट्र संघाला सर्वोच्च स्थान सिक्कीम संघावर १३५ धावांनी विजय
सोलापूर : येथील पार्क मैदानावर सुरू असलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब गटात महाराष्ट्राच्या संघाने सिक्कीम संघाचा दुसरा डाव ९० धावात गुंडाळत १३५ धावांनी विजय मिळवला. ब गटात महाराष्ट्र संघाने या सामन्यातून ७ बोनस गुणांची कमाई करत २६ गुणांसह सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
शनिवारी (ता. ४) सायंकाळी सिक्कीम संघाची दुसऱ्या डावाची स्थिती ४ बाद ४७ होती. त्यानंतर आज सकाळी सिक्कीम संघाने दुसरा डाव सुरू केला. धावफलकावर ६० धावा असताना प्रथमेश गावडेने ५ बळी घेत झटका दिला. पुढच्याच षटकात यश बोरकरने सलग दोन बळी घेत सिक्कीम संघाची अवस्था अधिकच वाईट केली. नंतर महाराष्ट्राच्या प्रतीक तिवारीने एकाच षटकात हॅटट्रिक घेत सिक्कीमचा डाव गुंडाळला.
सिक्कीमचे अर्णव गुप्ता (२५ धावा), रोशन प्रसाद (२१ धावा) व पूर्णा भट्ट (१९ धावा) या फलंदाजांनी अयशस्वी लढत दिली. हा सामना महाराष्ट्र संघाने एक डाव राखून १३५ धावांनी जिंकला. महाराष्ट्राच्या वतीने प्रथमेश गावडेने सर्वाधिक म्हणजे पाच बळी मिळवले. तर यश बोरकरने सामन्यात एकूण ९ बळी घेत सर्वोच्च कामगिरी केली.
स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मागच्या सामन्यात आसामविरुद्ध १८५ धावांनी, हैदराबादविरुद्ध एक डाव १२ धावांनी विजय मिळवला होता तर पाँडिचेरी व सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली होती. स्पर्धेच्या एकूण ६ गटातील विदर्भ, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, बडोदा आणि पंजाब ह्या संघांनी बाद फेरी गाठली असून या संघांचे शेवटचे साखळी सामने अजून चालू आहेत. त्यांच्या साखळी सामन्याच्या निकालावर कोणते संघ थेट उपांत्यपूर्व फेरी गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.