मुंबई सिटीची एफसीची मॅंचेस्टर सिटीकडे मालकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीची मालकी असलेल्या सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसीची मालकी मिळवली आहे. त्यांनी रणबीर कपूर सहमालक असलेल्या या क्‍लबमधील 65 टक्के मालकी घेतली आहे.

मुंबई : प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीची मालकी असलेल्या सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसीची मालकी मिळवली आहे. त्यांनी रणबीर कपूर सहमालक असलेल्या या क्‍लबमधील 65 टक्के मालकी घेतली आहे.

अबू धाबीतील उद्योगपती शेख मन्सूर बिन झायेद यांचा सिटी फुटबॉल ग्रुपमध्ये मोलाचा वाटा आहे. आता त्यांनी भारताची प्रमुख लीग झालेल्या आयएसएलमधील मुंबई सिटी एफसी या क्‍लबमध्ये महत्त्वाचा वाटा घेतला आहे. अर्थात भारतातील लीगमध्ये सहमालकी असलेला हा पहिला युरोपियन क्‍लब नाही. आयएलएलला सुरुवात झाली, त्या वेळी ऍटलेटिको माद्रिदने कोलकात्यातील संघाची सहमालकी घेतली होती; मात्र आता प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीची साथ जोडल्यामुळे भारतीय फुटबॉलमध्ये जागतिक फुटबॉलचा रस वाढत असल्याचेच दिसत आहे.

मॅंचेस्टर सिटीची मालकी असलेला सिटी फुटबॉल ग्रुप आपला विस्तार करीत आहे. त्यांनी यापूर्वी जपानमधील योकोहामा एफ मरिनोस तसेच चीनमधील सिऊचिन जिऊनिऊ या क्‍लबची मालकी मिळवली होती. मुंबई सिटी एफसीमधील आता 35 टक्केच वाटा रणबीर कपूर आणि बिमल पारेख यांच्याकडे राहील. मुंबई सिटी एफसीची मालकी सिटी फुटबॉल ग्रुप इंडियाकडे असेल. त्याचे सीईओ डॅमिएन विलोबी असतील. अर्थात गतवर्षी आयएसएलच्या मुंबईतील पहिल्या सामन्यास सिटी फुटबॉल ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्या वेळीच याची प्रक्रिया सुरू झाली होती, असे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manchester city takovers mumbai city fc