अडखळत्या सुरुवातीनंतर सिटीचा विजय

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

मॅंचेस्टर सिटीने अडखळत्या सुरुवातीनंतर ऍस्टॉन व्हिलाचा पाडाव केला आणि आघाडीवर असलेल्या लिव्हरपूलवरील दडपण वाढवले. दरम्यान, ख्रिस्तियन पुसिलिच याच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर चेल्सीने बर्नलीचा 4-2 असा पाडाव केला.

लंडन : मॅंचेस्टर सिटीने अडखळत्या सुरुवातीनंतर ऍस्टॉन व्हिलाचा पाडाव केला आणि आघाडीवर असलेल्या लिव्हरपूलवरील दडपण वाढवले. दरम्यान, ख्रिस्तियन पुसिलिच याच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर चेल्सीने बर्नलीचा 4-2 असा पाडाव केला.

पूर्वार्धातील खराब खेळाची उत्तरार्धात पुरेपूर भरपाई करीत सिटीने 3-0 बाजी मारली. रहीम स्टर्लिंग, डेव्हिड सिल्वा आणि इल्काय गुंडॉगॅन यांनी केलेले गोल उत्तरार्धातीलच होते. सिटीच्या विजयामुळे आता लिव्हरपूल आणि सिटीतील फरक तीन गुणांचाच झाला आहे. अर्थात लिव्हरपूल टॉटनहॅमला हरवून ही आघाडी वाढवू शकेल. गतवर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये लिव्हरपूल आणि टॉटनहॅंमच विजेतेपदासाठी लढले होते. एव्हर्टनला ब्रायटनविरुद्ध 2-1 आघाडीनंतरही जिंकता आले नाही.

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय खेळाडू पुल्सिक याच्यासाठी चेल्सीने सुमारे साडेसात कोटी डॉलर मोजले आहेत. तरीही त्याला संघाबाहेर ठेवले जात आहे याकडे लक्ष वेधले जात होते. मात्र संधी मिळताच या 21 वर्षीय युवकाने लक्षवेधक कामगिरी केली. त्याने डाव्या पायाने, उजव्या पायाने; तसेच हेडरद्वारे गोल केला. दरम्यान, चेल्सीने अव्वल चार संघात स्थान मिळवले आहे. त्यांचे आणि लिस्टर सिटीचे समान 20 गुण आहेत.

लेवांडस्कीचा विक्रम
बर्लिन ः रॉबर्ट लेवांडस्कीने बंडेस्लीगा अर्थात जर्मनी लीग मोसमातील सलग नवव्या सामन्यात गोल केला आणि त्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिचने युनियन बर्लिनचा 2-1 असा पाडाव केला. यामुळे बायर्नने अग्रक्रमांक मिळवला. त्याने बायर्नकडून खेळताना सलग तेराव्या लढतीत गोल केला. त्याने बंडेस्लीगामध्ये सलग आठ सामन्यात गोल करण्याचा पिएरे एमेरिक याचा विक्रम मोडला. त्याने या मोसमात 14 सामन्यात 19 गोल केले आहेत.

ऍटलेटीकोची संयुक्त आघाडी
माद्रिद ः दिएगो कोस्टाला वगळण्याचा निर्णय ऍटलेटीकोचे मार्गदर्शक दिएगो सिमॉन यांनी घेतल्यावर त्यावर टीका झाली होती; पण ऍटलेटीकोने ला लिगामध्ये संयुक्त आघाडी घेताना ऍथलेटिक बिल्बाओला 2-0 असे हरवले. एवढेच नव्हे; तर कोस्टाऐवजी घेतलेल्या अल्वारो मोरोतो याने गोलही केला. मोरोतो याने बिल्बाओविरुद्ध विजयी गोल केला होता. या विजयामुळे ऍटलेटीकोने गुणतक्‍त्यात रेयाल माद्रिदला मागे टाकले आणि बार्सिलोनासह संयुक्त अव्वल स्थान मिळवले.

रोनाल्डोविना युव्हेंटिसची बरोबरी
मिलान ः ख्रिस्तियानो रोनाल्डोविना खेळणाऱ्या युव्हेंटिसला लीसविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली, त्यामुळे इंटर मिलान आघाडी घेतील असे वाटले होतेड पण पार्माविरुद्धच्या 2-2 बरोबरीमुळे इंटरची संधी हुकली आणि युव्हेंटिसचे अग्रस्थान रायम राहिले. युव्हेंटिसचे नऊ सामन्यानंतर 23 गुण आहेत; तर इंटरचे 22. चॅम्पियन्स लीग लढती लक्षात घेऊन युव्हेंटिसने रोनाल्डोला ब्रेक दिला होता. मात्र युव्हेंटिसच्या गोलच्या दवडलेल्या किमान दहा संधींचा जास्त फटका बसला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchester city won after goal less first half