मॅंचेस्टर युनायटेडकडून चेल्सीचा धुव्वा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मॅंचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत जोरदार सुरुवात करताना चेल्सीचा 4-0 असा सहज पाडाव केला. फ्रॅंक लॅम्पार्ड यांच्या मार्गदर्शनाच्या पहिल्या सामन्यात चेल्सीची सुरुवात चांगली होती, पण सदोष नेमबाजीचा त्यांना फटका बसला.

लंडन : मॅंचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत जोरदार सुरुवात करताना चेल्सीचा 4-0 असा सहज पाडाव केला. फ्रॅंक लॅम्पार्ड यांच्या मार्गदर्शनाच्या पहिल्या सामन्यात चेल्सीची सुरुवात चांगली होती, पण सदोष नेमबाजीचा त्यांना फटका बसला.

मार्कस्‌ रॅशफोर्ड आणि अँथनी मार्शियल यांनी मार्गदर्शकांचा विश्‍वास सार्थ ठरवताना युनायटेडच्या आक्रमणात मोलाची कामगिरी बजावली. चेल्सीचा खेळ पूर्वार्धात जास्त आकर्षक तसेच वर्चस्व राखणार होता, पण बचावात तसेच आक्रमणातील चुका त्यांना भोवत होत्या. विश्रांतीची 1-0 आघाडी युनायटेडला राखणे अवघड जाईल असेच वाटत होते, पण सामन्याच्या अंतिम टप्प्यात 95 सेकंदात दोन गोल करीत युनायटेडने निकाल स्पष्ट केला.

युनायटेडने या लढतीसाठी मैदानात उतरवलेल्या संघातील खेळाडूंचे सरासरी वय 24 वर्षे होते. त्यांनी आक्रमणास पसंती दिली. त्यातच चेल्सीचे भरवशाचे बचावात्मक खेळाडू अपयशी ठरले.

दरम्यान, पिएरे एमेरिक ऑबमेयांग याच्या गोलमुळे आर्सेनलने न्यूकॅसलचा 1-0 पाडाव केला. गतमोसमातील अपयशानंतर आर्सेनलने काही खेळाडूंची खरेदी केली आहे. गतमोसमात अवे लढतीत ते अपयशी ठरले होते. या वेळी अवे लढत जिंकूनच आर्सेनलने मोसमास विजयी सुरुवात केली. त्याच वेळी त्यांचा बचाव भक्कम झाला असल्याचे दिसले.

मैदानात नसलेल्या नेमारवर चाहत्यांची टीका
पीएसजीने फ्रेंच लीग वन विजेतेपद राखण्याची मोहीम सुरू करताना नाईम्सचा 3-0 पाडाव केला. या लढतीपूर्वी नेमारच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत देण्यात आले, तसेच त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. नेमार मैदानात नसतानाही त्याच्या विरोधातील फलक स्टॅंडमध्ये झळकत होते. किलान एम्बापे आणि अँगेल डि मारिया यांनी नेमारच्या उपस्थितीत पीएसजी काय करू शकतात हे दाखवले. नेमार गेट आऊट या अर्थाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. बार्सिलोनाचा पीएसजीविरुद्धचा विजय आपला संस्मरणीय सामना असल्याच्या नेमारच्या टिप्पणीचाही समाचार घेण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manchester united start the campaign with 4-0 win over chelsie